दारूवरुन वाद झाला; मद्यपी मुलाने बापाचा खूनच केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:20 IST2023-09-11T11:17:38+5:302023-09-11T11:20:48+5:30

शिवीगाळ करू नको म्हणताच घातला पाठीत लोखंडी रॉड

Nagpur man kills his father after he refuses money for liquor | दारूवरुन वाद झाला; मद्यपी मुलाने बापाचा खूनच केला

दारूवरुन वाद झाला; मद्यपी मुलाने बापाचा खूनच केला

नागपूर : एका भांडखोर मुलाने आपल्याच वडिलांशी वाद घालत त्यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने वार करत त्यांची हत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

शनिवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. कृष्णराव सदाशिव रायपूरकर (७५, प्लॉट नं. ८३ / बी, शक्तिमातानगर, दुसरी गल्ली, पाण्याच्या टाकीजवळ) असे मृतकाचे नाव आहे. ते भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी होते व ते त्यांचा मुलगा अमित (४५) व सून अर्चना (३२) यांच्यासोबत राहत होते. अमितला दारूचे व्यसन होते व तो त्यावरून अनेकदा घरी वाद घालायचा. घर कृष्णराव यांच्या पेन्शनवर चालत होते.

शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान त्यांचा दारूच्या कारणावरूनच अमितसोबत वाद झाला. काही वेळातच वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर झाले आणि अमितने वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून वडिलांनी त्याला टोकले व मला शिवीगाळ करू नको, असे म्हटले. यावरून अमित संतापला व त्याने घरातील लोखंडी रॉडने स्वतःच्या वडिलांच्या पाठीवर जोरदार प्रहार केले. यात कृष्णराव गंभीर जखमी झाले व ते बेशुद्ध पडले. त्यांना शेजारी व कुटुंबीयांनी तातडीने एका खासगी दवाखान्यात नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची सून अर्चना हिने पोलिसांना या घटनेची सूचना दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा अमितविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अमितला अटक केली असून, त्या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरली व लोकांमध्ये खळबळ उडाली होती.

Web Title: Nagpur man kills his father after he refuses money for liquor