बँकेनं कर्ज नाकारलं, संतापलेल्या तरुणानं केलं असं काही, ऐकून पोलीसही चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:19 IST2025-04-10T18:15:37+5:302025-04-10T18:19:20+5:30
बँकेने कर्ज नाकारले म्हणून एका तरुणाने बँकेतील कर्मचाऱ्याचे रेड लाईट एरियामधील व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला ब्लॅकमेल केले.

बँकेनं कर्ज नाकारलं, संतापलेल्या तरुणानं केलं असं काही, ऐकून पोलीसही चक्रावले!
बँकेने कर्ज नाकारले म्हणून संतापलेल्या एका तरुणाने बँकेच्या कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून २.३५ लाख रुपयांच्या किंमतीचे सोने आणि मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, आदेश समुद्रे (वय, ५५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी एका बँकेत कर्ज मिळवण्यासाठी गेला होता. पण बँकेतील कर्मचाऱ्याने काही कारणास्तव त्याला कर्ज देण्यास नकार दिला. मात्र, यामुळे आरोपी नाराज झाला आणि त्याने सूड घेण्याचे ठरवले. बँक कर्मचारी रेड लाईट एरियात जात असल्याची आरोपीला माहिती होती. आरोपीने त्याची रेकॉर्डिंग केली.
दरम्यान, १५ मार्च रोजी आरोपीने मारवाडी चौकापर्यंत बँक कर्मचाऱ्याचा पाठलाग केला आणि रेकॉर्डिंग त्याच्या पत्नीला दाखवण्याची धमकी दिली. तसेच त्याच्याजवळील मौल्यवान वस्तू मागितल्या. आरोपीने बँक कर्मचाऱ्यांकडून सोन्याचे दागिने घेतल्यानंतरही त्याला ब्लँकमेल करणे सुरूच ठेवले. जेव्हा बँक कर्मचारी आरोपीला टाळू लागला, तेव्हा आरोपीने मागे नारी रोडवरील बँक कर्मचाऱ्याच्या घरी गेला. तसेच बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीला तुझा नवरा रेड लाईट एरियामध्ये जात असल्याचे सांगितले.
संपूर्ण प्रकार लक्षात येताच बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीने कपिल नगर पोलीस ठाणे गाठले. परंतु, आरोपीने बँक कर्मचाऱ्याला मारवाडी चौकात लुटल्याने कपिल नगर पोलिसांनी तिला लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच आरोपीने बँक कर्मचाऱ्याकडून हिसकावून घेतलेले दागिनेही जप्त केले.
पोलिसांच्या दिलेल्या म्हणण्यानुसार, आरोपीने जलद पैसे कमविण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी हा प्लान आखला होता. कारण बँकेच्या कर्मचाऱ्याने त्याला कर्ज देण्यास नकार दिला होता. आरोपीने बँक कर्मचाऱ्याला रेड लाईट एरियामध्ये जाताना पाहिले आणि संधीचा गैरफायदा घेतला.