लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहासात २०२० हे वर्ष सर्वार्थाने संकटवर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. कलाक्षेत्राला तर या वर्षात प्रचंड घरघर लागलेली आहे. बॉलिवूड म्हणा व इतर कला क्षेत्रातील कलावंतांचे निधन याच काळात झाल्याने कलाक्षेत्रासाठी सर्वात दु:खदायी म्हणून हे वर्ष ठरत आहे. नागपूरकरांवरही गेल्या १२ दिवसात चार गायक कलावंतांना कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे.चित्रपट गीते, भजनसंध्या, जागरणांमध्ये आपल्या स्वरांनी कायम नागपूरकर रसिकांचे मनोरंजन करणारे तीन गायक कलावंत मो. अफजल, शेखर घटाटे, सुधीर माणके व विजय चिवंडे यांचे गेल्या १२ दिवसात निधन झाले. २ ऑगस्टला मो. अफजल व शेखर घटाटे, ८ ऑगस्टला सुधीर माणके तर १४ ऑगस्टला विजय चिवंडे यांनी अखेरचा श्वास घेतला. शेखर घटाटे हे नागपुरात गायक व इव्हेंट मॅनेजर म्हणून विख्यात होते. त्यांचे नेताजी मार्केटमध्ये एस.कुमार इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती तर मो. अफजल हे विशेषत्वाने मो. रफी यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करत असत. १९९४ मध्ये त्यांनी त्याच अनुषंगाने फनकार आर्केस्ट्राची स्थापना केली होती. सुधीर माणके हे नागपूरच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये कार्यरत होते. काही दिवसापूर्वी त्यांची बदली जळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये झाली होती. नोकरीसोबतच गायनाचा छंद त्यांनी जोपासला होता आणि बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गोड स्वरांनी नागपूरकरांना रिझवले होते. या दोघांच्या शोककळेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असलेल्या नागपूरच्या संगीतक्षेत्रावर १४ ऑगस्टला पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्णवेळ गायनाच्या क्षेत्रात करिअर करत असलेले ४२ वर्षीय विजय चिवंडे यांचा पहाटेच मृत्यू झाला. दोनच दिवसाआधी त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. रात्री त्यांनी घरच्यांशी आनंदाने संवादही साधला होता. मात्र, पहाटे त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि कलाक्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले. गेल्या २० वर्षापासून ते संगीत क्षेत्रात होते आणि हजारोंच्या वर गायनाचे त्यांचे कार्यक्रम झाले होते. मो. रफी यांचा आवाज म्हणून चिवंडे यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी व मुलगा आहे.
नागपूरने १२ दिवसात गमावले चार गायक : संगीतक्षेत्रावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:00 IST