पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
By नरेश डोंगरे | Updated: December 14, 2025 22:11 IST2025-12-14T22:09:43+5:302025-12-14T22:11:14+5:30
६० मिनिटांच्या कार्यक्रमाने मान्यवर मंत्रमुग्ध; मिळाली उत्स्फूर्त दाद

पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
लोकमत विशेष | नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राजकारण, समाजकारण, कला अन् क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटवून देश-विदेशात नाव उंचावणाऱ्या नागपूरकरांची आणखी एक लाैकिकास्पद प्रतिभा समोर आली. नागपूरकर लावण्य अंबादे यांनी जगातील दोन महासत्तांचे नेतृत्व करणारे पंतप्रधाननरेंद्र मोदी तसेच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आपल्या सतार वादनाने मंत्रमुग्ध केले. नागपूरकरच नव्हे तर तमाम महाराष्ट्रीयन कलावंतांची मान उंचावणारी ही घडामोड आज चर्चेतून उघड झाली.
नागपूरमध्ये जन्म आणि येथेच बीएपर्यंतचे शिक्षण झालेले लावण्य यांना बालवयापासूनच सतार वादनाचे वेड होते. वडिल भजनदास आणि आई लिलाबाई अंबादे यांनी मुलाचे पाय पाळण्यात बघितले अन् तसे नियोजन केले. त्यानुसार, दहावीत असतानापासून तत्कालिन सुप्रसिद्ध सरोदवादक पं. शंकर भटाचार्य यांच्याकडे लावण्यने बाळकडू गिरवणे सुरू केले. नंतर त्यांनी दिल्लीतील ख्यातनाम सतारवादक पं. पार्था दास यांच्याकडून सतार वादनाचे धडे घेतले. दरम्यान इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धेत भारतीय शास्त्रीय संगीत (सितार) या विषयात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी नागपूरचे नाव उज्ज्वल केले. त्यानंतर छत्तीसगड येथील इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, खैरागड येथून सितार विषयात सुवर्णपदकासह एमएची पदवी मिळवली. देश-विदेशातील संगीत महोत्सवांमध्ये लावण्यने झंकारलेली सतार रसिकच नव्हे तर नामवंत कलावंतांनाही जिंकू लागली. ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अंतर्गत इक्वाडोर, कोलंबिया श्रीलंका, स्पेन, फ्रान्समध्येही लावण्यच्या मैफली झाल्या.
या पार्श्वभूमीवर, रशियन पंतप्रधान व्लादिमिर पुतिन ४ डिसेंबरला भारत दाैऱ्यावर आले. ५ डिसेंबरला दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये त्यांच्यासाठी एका खास संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नागपूरकर लावण्य अंबादे (सतार), विनयकुमार (बासरी, प्रयागराज) आणि मिहिरकुमार नट्टा (तबला, कोलकाता) यांनी सूर छेडले.
राग मधुवंती, मी डोलकर दर्याचा राजा (महाराष्ट्रीयन लोकसंगीत), गुजराती गरबा, तारी झम तारी झम (ओडिशा लोकसंगीत), रशियन साँग तसेच मिले सूर मेरा तुम्हारा आदी सुरेल रचनांचे सादरीकरण करून लावण्य, विनयकुमार आणि मिहिरकुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियन पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्यासह मैफलित बसलेल्या सर्वच दिग्गजांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. दोन्ही पंतप्रधानांनी सतारवादनाची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यांच्यासोबत छायाचित्रही काढून घेतले.
आयुष्यातील अविस्मरणीय मैफल
आज अचानक संपर्क झालेल्या लावण्यने 'लोकमत प्रतिनिधीशी' बोलताना या मैफलीची माहिती दिली. जगातील दोन दिग्गज नेत्यांकडून त्यावेळी मिळालेली दाद या मैफलीला आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय मैफल बणवून गेली, अशी प्रतिक्रियाही त्यांनी 'लोकमत'ला दिली. ही केवळ एक संगीत मैफल नव्हती, तर नागपूरच्या संस्कृतीचा जागतिक मंचावर उमटलेला सुवर्णसूर होता, असे ते म्हणाले.