मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपुरात जास्त एमपीडीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 10:55 AM2021-10-27T10:55:48+5:302021-10-27T14:32:28+5:30

गेल्या १० महिन्यांत नागपूर शहर पोलिसांनी तब्बल ५१ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई केली. मुंबई, ठाणे, पुणे आयुक्तालयाच्या तुलनेत हा आकडा कितीतरी पट अधिक असून राज्यात पहिल्या क्रमांकाचा आहे.

Nagpur has more MPDA than Mumbai, Pune | मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपुरात जास्त एमपीडीए

मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपुरात जास्त एमपीडीए

googlenewsNext
ठळक मुद्देअट्टल गुन्हेगारांना कारागृहात डांबण्याची मोहीमअकोला पोलीस दुसऱ्या स्थानी

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर पोलिसांनी गेल्या १० महिन्यात तब्बल ५१ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई केली आहे. मुंबई-पुणे आयुक्तालयाच्या तुलनेत नागपूर पोलिसांची ही कारवाई कितीतरी पट अधिक आहे. अर्थात राज्यातील ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तालयांच्या कारवाईच्या तुलनेत हा आकडा पहिल्या क्रमांकाचा आहे.

गुन्हेगारांना हतबल करण्यासाठी पोलिसांकडे असलेले सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे मकोका, एमपीडीए आणि तडीपारीचा आदेश होय. एकदा हे अस्त्र कुण्या गुन्हेगारावर उगारले की त्या गुन्हेगाराचा मुक्काम किमान ६ ते १२ महिने कारागृहातील कोठडीत असतो. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर ठिकठिकाणचे पोलीस मकोका, एमपीडीए, तडीपारीचा बडगा उगारतात. सराईत गुन्हेगार मोकाट राहू नयेत तसेच गुन्हेगारी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगारावर मकोका, एमपीडीए आणि तडीपारीचा आदेश बजावला जातो. मात्र, अलीकडे तडीपारीचा आदेश निष्प्रभ ठरत असल्याचे अनेक प्रकरणात उघड झाले आहे.

ठराविक मुदतीपर्यंत नागपुरात परतायचे नाही, अशी ताकीद देऊन तडीपार केलेल्या गुन्हेगाराला पोलीस बाहेरगावी नेऊन सोडतात; परंतु तो गुन्हेगार लगेच आपल्या शहरात परततो अन् गुन्हेगारीही करतो. नागपुरात असे दोन डझनपेक्षा जास्त तडीपार गुन्हेगार सापडले आहेत. त्यामुळे तडीपारीऐवजी, मकोकानंतर एमपीडीएवर शहर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

एकदा एमपीडीएची कारवाई केली की किमान ६ ते १२ महिने त्या गुन्हेगाराचा मुक्काम कारागृहात असतो. त्याला कारागृहात डांबले की त्याचे चेलेचपाटेही दहशतीत येतात. अर्थात सामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी तेवढ्या कालावधीसाठी कमी होते. ते लक्षात घेत शहर पोलिसांनी काही महिन्यात मकोका आणि एमपीडीए अंतर्गत कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे.

नागपुरात सराईत गुन्हेगारांच्या १० मोठ्या टोळ्या आहेत. त्यात १०० ते १५० गुन्हेगारांचा समावेश आहे. यातील संतोष आंबेकर, राजू भद्रे, रणजित सफेलकरच्या टोळीसह बहुतांश टोळ्यांवर मकोका लावून पोलिसांनी ९० पेक्षा जास्त गुन्हेगारांना आतमध्ये डांबले. काही फरार असून जामिनावर आलेल्यांपैकी काही नागपूर बाहेर राहतात. उर्वरित सराईत गुन्हेगारांची कुंडली पोलिसांनी तयार केली असून, त्यांच्यावर एमपीडीए लावून त्यांना कारागृहात डांबण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या १० महिन्यांत शहर पोलिसांनी तब्बल ५१ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई केली. मुंबई, ठाणे, पुणे आयुक्तालयाच्या तुलनेत हा आकडा कितीतरी पट अधिक असून राज्यात पहिल्या क्रमांकाचा आहे. नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या तीन आयुक्तालयात प्रत्येकी एमपीडीएची फक्त एकेकच कारवाई झाली आहे.

अकोला दुसऱ्या स्थानी

दुसऱ्या नंबरवर अकोला असून, अकोला पोलिसांनी ३१ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी ८, मुंबई पोलिसांनी ७, औरंगाबाद ६, अमरावती ५, ठाणे आणि सोलापूर पोलिसांनी प्रत्येकी ३, तर नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नाशिक पोलिसांनी प्रत्येकी केवळ एक एमपीडीएची कारवाई केली आहे.

Web Title: Nagpur has more MPDA than Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.