Nagpur: गोंडवाना एक्सप्रेसमध्ये ‘गांजा-बाई’ ताब्यात, सात किलो गांजा जप्त
By नरेश डोंगरे | Updated: July 20, 2025 21:35 IST2025-07-20T21:33:08+5:302025-07-20T21:35:17+5:30
Nagpur Crime News: गोंडवाना एक्सप्रेसमध्ये आढळेल्या एका संशयास्पद बॅगवर रेल्वे पोलिसांनी नजर रोखल्यामुळे गांजा तस्करीचे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी मध्यप्रदेशातील एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून सात किलो गांजासह १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nagpur: गोंडवाना एक्सप्रेसमध्ये ‘गांजा-बाई’ ताब्यात, सात किलो गांजा जप्त
- नरेश डोंगरे
नागपूर - गोंडवाना एक्सप्रेसमध्ये आढळेल्या एका संशयास्पद बॅगवर रेल्वे पोलिसांनी नजर रोखल्यामुळे गांजा तस्करीचे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी मध्यप्रदेशातील एका महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून सात किलो गांजासह १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणे आलेली गोंडवाना एक्सप्रेस येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर थांबली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वेचे एपीआय नीलम डोंगरे आणि सहकाऱ्यांनी कोच नंबर बी-३ ची तपासणी सुरू केली. यावेळी त्यांना बर्थ नंबर २८ खाली एक ट्रॉलीबॅग आढळली. संशय आल्याने पोलिसांनी आजुबाजुच्या प्रवाशांना त्या बॅगबाबत विचारणा केली. यावेळी ती बॅग कुणाची आहे, हे माहिती नसल्याचे सर्व प्रवाशी सांगू लागले.
परिणामी काही वेळेसाठी रेल्वे पोलिसांचेही कान उभे झाले. अनामिक शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी लगेच रेल्वे स्थानकावरील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले. पथकातील श्वानाने त्या बॅगमध्ये स्फोटके नसून अंमली पदार्थ असल्याचे संकेत दिले. त्यामुळे पोलिसांनी या बॅगला उघडून तपासणी केली असता त्यात गांजाची बंडलं दिसून आली. तो गांजा आणि बॅग बाळगणारी महिला सुकना अवधेश मेहरा हिला ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि उपविभागीय अधिकारी पाडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात, एपीआय नीलम डोंगरे तसेच कर्मचारी मजहर अली, हिंगणे, संजय पटले, शबाना पठाण, ममता तिवारी, मंजूषा खांडेकर अविन गजबे, राहुल यावले, चंद्रशेखर मदनकर तसेच बीडीडीएसचे हवालदार दीपक डोर्लीकर, जयश्री प्रधान, गजानन शेळके, श्वान योध्दा आणि मलोटे यांनी ही कामगिरी बजावली.
संशयास्पद वर्तनामुळे पकडली गेली
ही कारवाई सुरू असताना बर्थवरची हिला संशयास्पद हालचाली करू लागली. संशय आल्याने पोलिसांनी तिला कसून विचारणा केली. त्यानंतर ही बॅग आपलीच असल्याचे तिने कबुल केले. सुकना अवधेश मेहरा (वय ४०) असे महिलेचे नाव असून ती रसुलिय, होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी तिच्याकडून ६.९१० किलो गांजा, मोबाईल तसेच अन्य साहित्यासह एकूण १.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तिला एनडीपीएस कायद्याच्या कलम २० (ब) अन्वये अटक करण्यात आली.