नागपुरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ४५ लाखाची दंड वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:21 IST2020-08-15T01:19:39+5:302020-08-15T01:21:20+5:30
सुरक्षित अंतर राखणे व मास्क परिधान करणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याचे पालन करीत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकट्या ग्रामीण भागातच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लाख रुपयाचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.

नागपुरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ४५ लाखाची दंड वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शासन व प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. सुरक्षित अंतर राखणे व मास्क परिधान करणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याचे पालन करीत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकट्या ग्रामीण भागातच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लाख रुपयाचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यासाठी शासन व प्रशासनाकडून काही दिशानिर्देश जारी केलेले आहेत. सामान्य नागरिकांसाठी नियम घालून देण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे आणि इतरांसोबत सुरक्षित अंतर ठेवणे हा होय. परंतु अनेक लोक या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनातर्फे अशा लोकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. शहरासोबतच तालुकास्तरावर आणि अगदी गावपातळीवरही कारवाई केली जात आहे. यासोबतच दुकानांचीही नियमित तपासणी केली जात आहे. दुकानांमध्ये गर्दी होत आहे का, नियमांचे पालन केले जात आहे का, वेळेवर दुकाने बंद केली जातात का, आदींची तपासणी केली जात असून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तालुका व गावपातळीवर राबविण्यात आलेल्या या कारवाईतून आतापर्यंत ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
मास्क लावा, स्वत:ची काळजी घ्या
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.