अखेर नागपूर ‘कर्फ्यू’मुक्त, सहा दिवसांनी बाजारपेठा सुरू, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 18:05 IST2025-03-23T18:04:32+5:302025-03-23T18:05:05+5:30
Nagpur News: १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती.

अखेर नागपूर ‘कर्फ्यू’मुक्त, सहा दिवसांनी बाजारपेठा सुरू, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
- योगेश पांडे
नागपूर - १७ मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांचेदेखील नुकसान होऊ नये अशी मागणी समोर येत होती. पोलिसांनी एकूण स्थितीचा आढावा घेत तहसील, कोतवाली, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यू मागे घेतला आहे. शहर ‘कर्फ्यू’मुक्त झाले असले तरी अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था मात्र तैनात राहणार आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. यात सक्करदरा, तहसील, कोतवाली, गणेशपेठ, यशोधरानगर, नंदनवन, इमामवाडा, शांतीनगर, लकडगंज, पाचपावली, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. शांतता प्रस्थापित झाल्याने संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर आली होती.
शनिवारी पोलिसांनी सक्करदरा, इमामवाडा, पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंजमधील नागरिकांना दिलासा देत तेथील कर्फ्यू हटविला होता. रविवारी परत एकदा पूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात आला व पोलीस आयुक्तांनी कोतवाली, तहसील, गणेशपेठ व यशोधरानगरमधील कर्फ्यूदेखील हटविण्याचे निर्देश दिले. दुपारी तीन वाजतापासून कर्फ्यू दूर झाला.
अनेक दुकाने, बाजारपेठा सुरू
कर्फ्यूमुळे या परिसरांमधील बाजारपेठा बंद होत्या व त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कर्फ्यू दूर होताच अनेक दुकानदारांनी लगेच दुकाने उघडली. तर काही बाजारपेठादेखील लहानमोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले.
सुरक्षायंत्रणांसमोर मोठे आव्हान
दरम्यान, संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा कायम राहणार आहे. इतर ठिकाणी पोलीस गस्तीवर राहणार आहेत. प्रस्थापित झालेली शांतता कायम राखून शहरात सद्भाव वाढविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.