नागपुरात मुलाच्या जेवणाचा डबा नेणाऱ्या पित्याला बोलेरोने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:43 IST2018-09-10T23:39:36+5:302018-09-10T23:43:42+5:30
मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या एका पित्याला भरधाव बोलेरोचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पित्याचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास माटे चौकाजवळच्या रिलायन्स फ्र्रेशजवळ हा भीषण अपघात घडला.

नागपुरात मुलाच्या जेवणाचा डबा नेणाऱ्या पित्याला बोलेरोने चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या एका पित्याला भरधाव बोलेरोचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पित्याचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास माटे चौकाजवळच्या रिलायन्स फ्र्रेशजवळ हा भीषण अपघात घडला.
तुकडोजीनगर ( सुभाषनगर) येथे राहणारे देवीदास दशरथ गुडधे (वय ५२) रिक्षाचालक होते. त्यांचा मुलगा पंकज शेवाळकर गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. ८ सप्टेंबरच्या दुपारी १२.३० वाजता गुडधे मुलाचा जेवणाचा डबा घेऊन रस्त्याने पायी जात असताना रिलायन्स फ्र्रेशच्या समोर एका भरधाव बोलेरोचालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आजूबाजूची मंडळी धावली. त्यांचा मुलगाही आला. गंभीर जखमी झालेल्या देवीदास गुडधे यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंकज देवीदास गुडधे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ही बोलेरो राखीव पोलीस दलाची असल्याचे सांगितले जाते. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून त्याबाबत स्पष्ट माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, मुलाला जेवू घालण्यासाठी गेलेल्या देवीदास गुडधे यांचा असा करुण अंत झाल्याने तुकडोजीनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.