फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 12:03 PM2022-07-07T12:03:35+5:302022-07-07T12:06:49+5:30

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Nagpur Farmhouse liquor party Raid : Two employees of Hingna police station suspended | फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देपरवानगीशिवाय आयोजित करण्यात आली होती पार्टी : पोलीस विभागात खळबळ

नागपूर : हिंगणा येथील फार्म हाऊसवर परवानगीशिवाय कथित रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणात हिंगणाचे ठाणेदार परदेशी यांची बदली झाल्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रविवारी रात्री झोन ३ चे डीसीपी गजानन राजमाने यांनी गिरनार फार्मवर सुरू असलेल्या या पार्टीवर छापा टाकला होता. पार्टीत दारूसोबत नशाही केली जात होती. सुमित ठाकूरसह अनेक गुन्हेगार पार्टीत सामील झाले होते. रेव्ह पार्टी आणि सुमितच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतरच राजमाने यांनी छापा टाकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पार्टी आयोजकांना इशारा दिल्यानंतर अमली पदार्थ काढून टाकण्यात आले. पार्टीचे आयोजन नफीस, शिवा आणि एका तरुणीने केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांनी हिंगणा पोलीस ठाणे आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे कार्यक्रमाच्या आयोजनाच्या परवानगीसाठी शेवटच्या क्षणी अर्ज केला, त्यामुळे पार्टी आयोजित करण्याची परवानगी मिळू शकली नाही. पोलिसांची परवानगी नसतानाही आयोजकांनी लोकांकडून प्रवेश फी म्हणून लाखो रुपये घेतले. यानंतर निर्धास्तपणे पार्टीचे आयोजन केले. कारवाईनंतर हिंगणा पोलीस अधिकारी केवळ पार्टीला परवानगी असल्याचे सांगून मुदतीचे उल्लंघन केल्याचा खोटा दावा करत राहिले.

प्रकरण तापल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हिंगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार परदेशी यांना तत्काळ पदावरून हटवले. तपासात हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय गायकवाड व ध्रुप पांडे यांनीही हलगर्जी केल्याचे समोर आले. गुप्तचर कर्मचारी असूनही त्यांनी पार्टी आयोजित करू दिली. त्यामुळे दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांशिवाय हिंगणा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पार्टीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.

माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही

पोलिसांच्या कारवाईनंतर सुमित ठाकूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो फटाके वाजवताना 'मी तो आहे ज्याचे तुम्ही काहीही वाकडे करू शकत नाही' असे म्हणत आहे. या व्हिडीओमुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे. सुमित मकोका प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. पार्टीत तो सापडल्यावर हिंगणा पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची सुटका झाली.

Web Title: Nagpur Farmhouse liquor party Raid : Two employees of Hingna police station suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.