नागपूर : महापालिका निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप व महायुतीच्या विजयामागे विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले. "डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे," असे ते म्हणाले.
बावनकुळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातही आलेले निकाल हे विकासावरचा विश्वास दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, असा स्पष्ट कौल मतदारांनी दिला आहे. महायुतीला टू-थर्ड बहुमत मिळण्याची शक्यता असून, भाजपचे ५१ टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.
नागपूरबाबत बोलताना ते म्हणाले की, नागपूर हे उपराजधानीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि महाराष्ट्रातील क्रमांक एक शहर आहे. "नागपूरकरांनी विकसित नागपूरसाठी मत दिले असून, जनतेच्या अपेक्षांनाच कौल दिला आहे," असे त्यांनी नमूद केले. प्राथमिक अंदाजानुसार संध्याकाळी पाच वाजेनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील इतर शहरांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "लातूरमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले, तर काँग्रेसने तेथे चांगली कामगिरी केली. चंद्रपूरचा निकाल अद्याप यायचा असून, पाच वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. अमरावतीत भाजपने चांगली लढत दिली असून अंतिम निकालानंतरच स्पष्ट आढावा घेता येईल," असे त्यांनी नमूद केले.
ईव्हीएमविषयीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, "ज्या ठिकाणी काँग्रेस, एमआयएम किंवा वंचित आघाडी जिंकली, तेथेही तीच यंत्रे होती. मग केवळ पराभव झाल्यावर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे लोकांना पटत नाही." भाजप पराभव स्वीकारतो, त्यातून शिकतो आणि पुन्हा जिंकतो, मात्र विरोधक पराभव स्वीकारत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
विजय साजरा करण्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजप विजयाचा उन्माद करणार नाही. "थोडासा जल्लोष, साधे सेलिब्रेशन होईल, पण जनतेला न पटणारे काहीही होणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण महाराष्ट्रही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असून, पुढील काही दिवसांत चिंतन करून पुढील वाटचाल ठरवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Chandrashekhar Bawankule credits BJP's victory to development and the double-engine government. He asserts Fadnavis is Maharashtra's brand, reflecting public trust in development. BJP expects a two-thirds majority, dismissing EVM concerns and promising modest celebrations.
Web Summary : चंद्रशेखर बावनकुले ने भाजपा की जीत का श्रेय विकास और डबल इंजन सरकार को दिया। उन्होंने कहा कि फडणवीस महाराष्ट्र का ब्रांड हैं, जो विकास में जनता के विश्वास को दर्शाता है। भाजपा को दो-तिहाई बहुमत की उम्मीद, ईवीएम चिंताओं को खारिज किया और मामूली जश्न का वादा।