नागपूर विभागाचा निकाल ९०.९२ टक्के, राज्यात आठव्या क्रमांकावर
By आनंद डेकाटे | Updated: May 5, 2025 15:50 IST2025-05-05T15:15:20+5:302025-05-05T15:50:33+5:30
मागच्या वर्षीच्या तुलनेत निकाल १.६० टक्केंनी घसरला घसरला : विभागात गोंदिया पहिल्या क्रमांकावर, गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल

Nagpur division's result is 90.92 percent, eighth in the state
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा नागपूर विभागाचा निकाल ९०.५२ टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये नागपूर विभाग राज्यात खालून दुसऱ्या स्थानी म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के लागला होता, यंदा त्यात १.६० टक्क्यांची घसरण झाली आहे.
मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नागपूर विभागातून एकूण १ लाख ५२ हजार ४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ५१ हजार ११६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८०५ विद्यार्थी (९०.५२ टक्के) उत्तीर्ण झाले. विभागातील निकालाच्या टक्केवारीत गोंदिया जिल्ह्याने ९४.०४ टक्के घेऊन अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याने ९३.४० टकके घेऊन विभागात दुसरा क्रमांक पटकावला.चंद्रपूर जिल्हा ८९.१७ टक्केसह तिसऱ्या क्रमांकावर, वर्धा ८७.७७ टक्केसह चौथ्या क्रमांकावर, भंडारा जिल्हा ८७.५८ टक्केसह पाचव्या क्रमांकावर तर गडचिरोली जिल्ह्याचा ८१.७७ टक्केसह सर्वात कमी निकाल राहिला.
यंदाही मुलींचा वरचष्मा
दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलीच पुढे राहिल्या. नागपूर विभागात एकूण ७४२०४ मुली बारावीच्या परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ६९५७६ म्हणजे ९३.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.४१ टक्के इतके राहिले. एकूण ७६९१२ मुलं परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६७,२२९ मुले उत्तीर्ण झाली.
नागपूर विभागाची स्थिती
एकूण नोंदणी : १,५२,०४६
परीक्षा देणारे विद्यार्थी : १,५१,११६
उत्तीर्ण विद्यार्थी : १,३६,८०५
एकूण टक्केवारी : ९०.५२
जिल्हानिहाय
गोंदिया – ९४.०४ टक्के
नागपूर - ९३.४० टक्के
चंद्रपूर - ८९.१७ टक्के
वर्धा – ८७.७७ - टक्के
भंडारा - ८७.५८ टक्के
गडचिरोली - ८१.७७ टक्के
नागपूर शाखानिहाय निकाल
विज्ञान- ९७.९६ टक्के
वाणिज्य - ९०.०२ टक्के
कला - ७९.०५ - टक्के