मोबाईल लंपास करणाऱ्याचा धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग, आरपीएफची प्रशंसनीय तत्परता
By नरेश डोंगरे | Updated: January 16, 2025 19:45 IST2025-01-16T19:43:24+5:302025-01-16T19:45:06+5:30
Nagpur Crime News: वेटिंग हॉलमध्ये सोफ्यावर पडून असलेला मोबाईल खिशात घालून जळगावकडे पळून जाणाऱ्या व्यक्तीचा आरपीएफच्या जवानाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग केला आणि त्याला अजनी रेल्वे स्थानकावर पकडले.

मोबाईल लंपास करणाऱ्याचा धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग, आरपीएफची प्रशंसनीय तत्परता
नागपूर - वेटिंग हॉलमध्ये सोफ्यावर पडून असलेला मोबाईल खिशात घालून जळगावकडे पळून जाणाऱ्या व्यक्तीचा आरपीएफच्या जवानाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग केला आणि त्याला अजनी रेल्वे स्थानकावर पकडले. त्याच्याकडून तो मोबाईलही ताब्यात घेण्यात आला. तक्रार मिळाल्यानंतर प्रशंसनीय तत्परता दाखवत आरपीएफने ही कामगिरी बजावली.
ग्वाल देवीया, मध्य प्रदेश येथील पूजा आणि साैरभकुमार जैन हे दाम्पत्य गाडीला वेळ असल्याने बुधवारी वेटिंग हॉलमध्ये बसले होते. बाहेर पडताना पूजा यांचा मोबाईल सोफ्यावर राहून गेला. ती संधी साधून जळगावच्या जितेंद्र कापसेने तो मोबाईल खिशात घालून नागपूर-पुणे ट्रेन पकडली. दरम्यान, जैन दाम्पत्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडे (आरपीएफ) मोबाईल चोरीची माहिती देताच त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तेव्हा हा मोबाईल उचलून एक व्यक्ती नागपूर-पुणे ट्रेन मध्ये बसल्याचे दिसून आले. त्यावेळी गाडी नुकतीच रेल्वे स्थानकावरून सुटली होती. ते पाहता अंमलदार कुंदन फुटाने यांनी लगेच त्या गाडीकडे धाव घेतली. गाडीत बसून त्या प्रवाशाची शोधाशोध केली. अजनी रेल्वे स्थानकावर गाडी पोहचल्यानंतर कुंदनने कापसेला ताब्यात घेतले. त्यानंतर कापसेसह कुंदन पुन्हा रेल्वे स्थानकावर पोहचला. कापसेच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला मोबाईल आपलाच असल्याचे जैन दाम्पत्याने सांगितले. त्यानंतर कायदेशिर प्रक्रिया पार पाडून हा मोबाईल त्यांना सोपविण्यात आला.
चोरीला गेलेला मोबाईल
चोरीला गेलेला मोबाईल एवढ्या तातडीने शोधून काढण्याच्या या कामगिरीसाठी कुंदन फुटाणे यांना उपनिरीक्षक विजयपाल सिंग, हवलदार वीना सोरेन आणि अंमलदार नीरज कुमार यांनी मदत केली. दरम्यान, आपला मोबाईल तातडीने परत मिळाल्याचे पाहून जैन दाम्पत्याने नागपूर आरपीएफचे आभार मानत आपल्या गावाचा मार्ग धरला.