चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, सीसीटीव्हीत घटना कैद
By योगेश पांडे | Updated: May 8, 2025 00:29 IST2025-05-08T00:28:32+5:302025-05-08T00:29:01+5:30
Nagpur Crime News: चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा येथे ही घटना घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, सीसीटीव्हीत घटना कैद
- योगेश पांडे
नागपूर - चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा येथे ही घटना घडली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
हेमलता किशोर वैद्य (३२, एकांशी सोसायटी, दाभा) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर अक्षय प्रभाकर दाते (२६) हा आरोपी आहे. हेमलता व अक्षय यांचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. ते दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सवालीवाघ येथील रहिवासी होते. ते लग्नदेखील करणार होते. मात्र हेमलताचे इतर कुणासोबतच तरी अफेअर सुरू आहे असा अक्षयला संशय होता. त्यावरून तो अनेकदा वाददेखील घालायचा. ती एकांशी सोसायटीतील पीस रेसिडेन्सी येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती.
मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अक्षय सोसायटीत गेला. तेव्हा ती एका व्यक्तीशी बोलत होती. अक्षयने त्यावरून तिच्याशी वाद घातला व तिच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार वस्तूने वार करत तिला जखमी केले. सोसायटीतील लोकांनी पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवलरामानी यांना याची माहिती दिली. तिला तेथील लोक मेयो इस्पितळात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला. केवलरामानी यांच्या तक्रारीवरून अक्षयविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हेमलताच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अक्षयला अमरावतीतून अटक केली. दरम्यान, या हल्ल्याचे फुटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले.
कामावर का ठेवले म्हणून विचारणा
केवलरामानी यांच्या सोसायटीतील काही फ्लॅट विकल्या जायचे होते. त्यामुळे हेमलता हिला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवले होते. मात्र काही महिन्यांअगोदर अक्षयने त्यांना फोन करून तिला कामावर का ठेवले असे विचारले होते व तिला कामावरून काढायला सांगितले होते. केवलरामानी यांनी तिला कामावरून काढले होते. मात्र तिने विनंती केल्यावर परत कामावर ठेवले. अक्षयने त्यानंतर पुन्हा फोन करून केवलरामानी यांना विचारणा केली होती.