नागपूर-छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर-बेळगाव विमानसेवा बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:07 IST2025-03-18T11:06:34+5:302025-03-18T11:07:27+5:30
Nagpur: आता प्रवाशांना रस्ते आणि रेल्वे मार्गाचा पर्याय

Nagpur-Chhatrapati Sambhajinagar and Nagpur-Belgaum flight services to be discontinued
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाइन्सने छत्रपती संभाजीनगर-नागपूर आणि नागपूर-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रस्ते आणि रेल्वे मार्गाचा पर्याय उरला आहे.
इंडिगोने छत्रपती संभाजीनगरचे ३० मार्च ते २५ ऑक्टोबर या कालावधीतील वेळापत्रक जाहीर केले होते. यात नागपूर विमानसेवा वगळली आहे. नागपुरातील हवाई क्षेत्रासाठी आणि विमान प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. इंडिगोने २ जुलै २०२४ पासून नागपूर-छत्रपती संभाजीनगर-गोवा आणि गोवा-छत्रपती संभाजीनगर-नागपूर विमानसेवा सुरू केली होती. या सेवेमुळे प्रवाशांना सव्वा तासात बेळगावला जाणे शक्य झाले होते. परंतु आता एप्रिलपासून नागपूरची विमानसेवा बंद होणार आहे. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. सध्या आठवड्यातून ३ दिवसांसाठी विमान उडते. २९ मार्चला ते शेवटचे उड्डाण ठरेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून केवळ गोवा-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-गोवा असेच विमान उड्डाण घेईल.
नागपूर-बेळगाव विमानसेवा १५ एप्रिलपासून बंद
उत्तम प्रतिसादानंतरही स्टार एअरची नागपूर ते बेळगाव दरम्यानची विमानसेवा १५ एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील बुकिंग बंद करण्यात आली आहे. ही विमानसेवा तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, सरकारकडून मिळणारे अनुदान (सबसीडी) बंद झाले आहे. एखाद्या विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी उडाण योजनेंतर्गत तीन वर्षे अनुदान (सबसिडी) मिळते. मात्र, नागपूर विमानसेवेची मुदत १५ रोजी संपत असल्याने त्यांनी बुकिंग बंद केले आहे. बेळगावातून नागपूर आणि नागपुरातून बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही सुविधा बंद होणार असल्याने अनेक उद्योजकांना बेळगावला जाण्यासाठी हुबळी किंवा गोवा विमानतळाला जावे लागेल. ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही होत आहे.