In Nagpur, a bribe police sub-inspector ran away from police station | नागपुरात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यातून ठोकली धूम
नागपुरात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यातून ठोकली धूम

ठळक मुद्देलाचेचे ५० हजार रुपये घेऊन गायब : पाचपावली ठाण्यात भूकंप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवार, वेळ दुपारी ४ वाजताची. पाचपावली पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. अचानक पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे ठाण्यातून पळतच बाहेर आले आणि पायाला भिंगरी लावल्यासारखे धूम ठोकत क्षणात दिसेनासे झाले. त्यांच्या मागेच एक जण आला अन् उड्डाणपुलाखाली असलेल्यांकडे हातवारे करीत ‘तो पळाला... तो पळाला... असे ओरडू लागला. त्यासोबतच एकच गलका झाला अन् साध्या वेषातील पाच ते सातजण पीएसआय बोंडेंना पकडण्यासाठी धावले. मात्र, बोंडे कसला सापडतो. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकाने धूम का ठोकली, त्याचा उलगडा न झाल्याने पोलीस ठाण्यातील मंडळी लगबगीने बाहेर आली. बोंडेमागे धावणारे हल्लेखोर असावे, असे समजून काहींनी पाठलागही केला. मात्र, ते हल्लेखोर नव्हे तर एसीबीवाले आहे, असे कळताच पाठलाग करणारी मंडळी डोक्यावर पाय ठेवून मागे पळत आली. एखाद्या मराठी सिनेमातील वाटावा, असा हा प्रसंग पाचपावली पोलीस ठाण्याचे वातावरण भूकंप आल्यासारखे सैरभैर करणारा ठरला.
अनेक वर्षे पोलीस कॉन्स्टेबल असलेले शंकर एस. बडे विभागीय परीक्षा देऊन गेल्या वर्षीच पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) झाले. त्यांना पाचपावली पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक (प्रोबेशनरी पीएसआय) म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधीही अजून पूर्ण व्हायचा आहे. तक्रारदार लालवेंद्र सिंग ठेकेदार असून रमाईनगरात राहतात. त्यांचे जसवंत आयनॉक्स मॉलमध्ये एक दुकान आहे. या दुकानाच्या संबंधाने लालवेंद्रसिंग यांच्याविरोधात एक तक्रारअर्ज पाचपावली ठाण्यात आला होता. सोमवारी १८ नोव्हेंबरला त्याची चौकशी करण्याच्या नावाखाली पीएसआय बोंडेने लालवेंद्रसिंगला ठाण्यात बोलविले. बोंडेने लालवेंद्रला पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत बदडबदड बदडले. त्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्याची भाषा वापरली. सिंग यांच्यासोबत असलेल्या मित्राने तडजोडीचा पर्याय विचारला असता बोंडेने तातडीने २ लाख रुपये पाहिजे, असे सुनावले. एवढेच नव्हे तर त्याच रात्री ९० हजार रुपये वसुलले. उर्वरित एक लाख, १० हजार रुपये मिळावे म्हणून बोंडे सिंग आणि त्याच्या मित्रांच्या मागे लागला होता. त्यांनी बोंडेचा तगादा चुकविण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
तक्रार नोंदवून घेतल्यानंतर शहानिशा करण्यात आली. त्यानंतर १ लाख, १० हजारांतील ५० हजार रुपये शुक्रवारी देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार, एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
ठरल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, योगेश्वर पारधी, नायक सचिन हलमारे, सुनील हुकरे, कृणाल कडव, दिनेश धार्मिक आदी मंडळी साध्या वेषात दुपारी ४ च्या सुमारास पाचपावली ठाण्याच्या परिसरात पोहचले. काही जण उजव्या बाजूच्या चहा टपरीजवळ, काही जण उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या दुचाक्यावर तर एक जण समोरच्या झेरॉक्सजवळ थांबले. लाचेचे ५० हजार रुपये घेऊन तक्रारदार पाचपावली ठाण्यात पोहचले. पीएसआय बोंडेने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. त्याला पोलीस ठाण्यातच बसवले अन् बोंडेला कशामुळे शंका आली कळायला मार्ग नाही. त्याने ठाण्यातून धूम ठोकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एसीबीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बोंडेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. दरम्यान, भूत मागे लागल्यासारखे बोंडे ठाण्यातून पळत सुटल्याने आणि त्यांच्यामागे काही जण धावत असल्याचे पाहून पोलीस ठाण्यातील काही जणांना भलतीच शंका आली. बोंडेवर कुणीतरी हल्ला करण्यासाठी धावल्याचे समजून ते बोंडेचा पाठलाग करणाºयांच्या मागे धावले. ते हल्लेखोर नव्हे तर एसीबीवाले आहे, बोंडेवर ट्रॅप झाला आहे, असे लक्षात येताच पाठलाग करणारी मंडळी मागे पळत आली. एसीबीचा चक्क पोलीस ठाण्यात ट्रॅप होणार होता, हे लक्षात आल्यानंतर पाचपावली पोलीस ठाण्याचे वातावरण कमालीचे सैरभैर झाले.

पाच पथके, सर्वत्र शोधाशोध !
लाचेची रक्कम घेऊन पळालेल्या बोंडेला शोधण्यासाठी एसीबीची पाच पथके आणि पाचपावली पोलिसांची पथके कामी लागली. त्याच्या घरी पोहचलेल्या एका पथकाने त्याची प्रतीक्षा केल्यानंतर तेथे झडती घेतली. पीएसआय बोंडेचा एक भाऊ राज्य राखीव दलात काम करतो, तिकडेही त्याला शोधण्यात आले. मात्र, बोंडे हाती लागला नाही.
पोलीस दलात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या बोंडेला कायद्याच्या पळवाटा माहिती आहे. त्यामुळे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो लाचेची ५० हजारांची रक्कम जाळून नष्ट करू शकतो. असे झाल्यास त्याच्यासोबतच एसीबीच्या अडचणीतही भर पडू शकते.

Web Title: In Nagpur, a bribe police sub-inspector ran away from police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.