Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री

By मोरेश्वर येरम | Published: March 23, 2024 08:48 PM2024-03-23T20:48:12+5:302024-03-23T20:48:21+5:30

Nagpur News: होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

Nagpur: 10 Crores turnover of Holi goods, sale of colors, gulal, picchkari, bales | Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री

Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री

- मोरेश्वर मानापुरे 
नागपूर - होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. विदर्भाची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नागपुरात यंदा सर्वच वस्तूंची जवळपास १० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

इतवारीतील व्यापारी अतुल लांजेवार म्हणाले, यंदा मनसोक्त होळी खेळण्याचे लोकांचे नियोजन दिसून येत आहे. फ्लॅट स्कीम, कॉलनी आणि मोहल्यांमध्ये आतापासून होळीचा उत्साह आहे. होळीला रंग, गुलाल आणि गाठ्यांना मागणी आहे. गुलाल उत्पादकांनी सर्व रंगाच्या गुलालाचे उत्पादन जानेवारीपासून सुरू केले आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मॉल, शहर, तालुके आणि राज्याच्या अन्य भागात विक्रीसाठी पाठविला. यंदा विदर्भात सर्वाधिक नागपुरी गुलालाची विक्री होणार आहे. याशिवाय रेशिम ओळीत रंगाची जास्त दुकाने आहेत.

रंगाच्या किमती दीडपट
यंदा रंगाच्या किमती दीडपट झाल्या आहेत. चांगल्या दर्जाच्या रोडामॅन (५०० टक्के) लाल रंगाची किंमत ५० रुपये तोळा (१० ग्रॅम) आहे. त्यापाठोपाठ हिरवा रंग विकला जातो. बाजारपेठेत होळीला रंगाची एक ते दीड कोटींची उलाढाल होते. पारंपारिक गुलाल १०० ते ११०, तर हर्बल गुलाल २०० ते २५० रुपये किलो आहे. रंग आणि गुलालाची बाजारपेठ ५ कोटींची आहे.

गाठी ९० ते ११० रुपये किलो
होळीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना साखरेपासून तयार केलेल्या गाठी देण्याची प्रथा आहे. होळीनिमित्त नागपुरातील जवळपास २५ ते ३० उत्पादक एक महिन्याआधीच गाठीचे उत्पादन करतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गाठीचे भाव १०० ते १२० रुपयांपर्यंत उतरले आहेत. दोन ते तीन किलो वजनातील आकर्षक डिझाईनची गाठी १३० ते १४० रुपये किलोदरम्यान आहे. नागपुरातील उत्पादकांकडून संपूर्ण विदर्भात गाठी विक्रीसाठी जातात. या व्यवसायात जवळपास दोन कोटींची उलाढाल होते. किराणा दुकानदारांपासून हातठेल्यावर गाठीची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

पिचकारी व मुखवट्यांची विक्री
इतवारीत पिचकारी, मुखवटे आणि अन्य वस्तूंचे ठोक विक्रेते आहेत. सर्व व्यापारी चीनमधून मुंबईत उतरणारा माल विक्रीसाठी नागपुरात मागवितात. हा माल संपूर्ण विदर्भात विक्रीसाठी जातो. यंदा ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत पिचकारी, २० ते २०० रुपयांपर्यंत मुखवटे विक्रीला आहेत. या वस्तूंची बाजारपेठ जवळपास २ कोटींची आहे.

होळीमुळे छोट्या विक्रेत्यांना सुगीचे दिवस
होळी सणामुळे छोट्या विक्रेत्यांना रंग, गुलाल, गाठी विक्रीतून चांगला नफा मिळतो. यंदा विक्रेत्यांमध्ये निश्चितच उत्साह दिसून येत आहे. अनेकजण हातठेल्यावर मालाची विक्री करीत असल्याचे चित्र शहराच्या विविध चौकात दिसत आहे. या सणामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन होत असल्याचे मत महाल चौकातील विक्रेत्यांनी व्यक्त केले.

गुलाब फुलांना असते मागणी
उपराजधानीत फुलांच्या होळीची क्रेझ वाढत आहे. होळीत रसायनापासून तयार झालेल्या रंगाने त्वचेला नुकसान होत असल्यामुळे नैसर्गिक फुलांनी अर्थात गुलाबाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्याकडे लोकांचा कल वाढला असून गुलाब फुलांना मागणी वाढली आहे. ठोक बाजारात भाव ८० ते १०० रुपयादरम्यान आहे.

Web Title: Nagpur: 10 Crores turnover of Holi goods, sale of colors, gulal, picchkari, bales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.