योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारमध्ये हत्या करून नागपुरात लपलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
मोहम्मद उर्फ डब्बू मोहम्मद आलमगिर (४२, हाजीपूर, वैशाली, बिहार) असे आरोपीचे नाव आहे. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी त्याला हिवरी नगर, पॅंथर हाऊस येथील पॉवर हाऊसजवळून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने बिहारमधील हाजीपूर टाऊन हद्दीत ३ मे रोजी प्रॉपर्टीच्या वादातून मोहम्मद शब्बीर आलम (नुनगोला, वैशाली, बिहार) याची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला व थेट नागपुरात आला. तो पॅंथरनगरमध्ये लपून बसला होता. त्याच्याविरोधात हाजीपूर टाऊन येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक केल्यावर बिहार पोलीसांना कळविण्यात आले व त्याला त्यांच्या हवाली करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील, प्रवीण राऊत, लोकेश रणदिवे, धीरज धोटे, दिनेश जुगनाहाके, प्रवीण मरापे, राहुल खळतकर, रामदास हरणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.