मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 05:17 PM2019-09-22T17:17:17+5:302019-09-22T17:19:34+5:30

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; अंबाझरी हद्दीत घडली घटना

Mumbai IT Engineer has died by drowning in nagpur | मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू

मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देरविवारी सकाळी ७ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. आरडाओरडीनंतर अंबाझरी पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आनंदला बाहेर काढले. मात्र आनंदचा मृत्यू झाला होता.

नागपूर - पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबई येथील एका तरुण आयटी इंजिनिअरचा त्याच्या मित्रांदेखत अंबाझरी तलावात बुडून करुण अंत झाला. आनंद व्दिवेदी (वय अंदाजे २० ते २२) असे मृताचे नाव आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. यावेळी त्याचा हर्षल गेडाम नामक मित्र तलावात पोहत होता. तर अन्य चार मित्र तलावाच्या काठावर बसून होते.
मृत आनंद मुंबईतील माटुंग्याचा रहिवासी होता. त्याची आई आणि भाऊ माटुंग्यातच राहतात. तर तो नागपुरात एका आयटी कंपनीत नोकरी करीत होता. आनंद, हर्षल गेडाम आणि अन्य चार असे एकूण सहा मित्र प्रतापनगरातील संभाजीनगरात एका सदनिकेत भाड्याने राहायचे. त्यातील एक जरीपटक्यातील, एक ठाण्यातील, आणि तीन मुंबईतील रहिवासी होत.  ते रोज सकाळी फिरायला जात होते. नेहमीप्रमाणे आज हे सहा मित्र अंबाझरी तलावाकडे फिरायला गेले. तेथे हर्षलने पोहायची ईच्छा व्यक्त केली. त्याचे पाहून आनंदही तयार झाला. तलावाच्या पाय-यापासून काही अंतरापर्यंतच पाण्यात जायचे, असे दोघांनी ठरवले. हर्षलला पोहता येत असल्यामुळे तो तलावात उडी घेऊन पोहत पोहत पुढे निघून गेला. चार मित्र तलावाच्या काठावर बसले. तर, आनंदने त्याचा मोबाईल आणि पाकिट मित्राजवळ दिले आणि तलावाच्या पाण्यात गेला. बराच वेळ झाला तरी तो पाण्यावर येत नसल्याचे मित्र घाबरले. त्यांनी आरडाओरड केली. यावेळी तलावात बरेच जण पोहत होते. मात्र, अंबाझरी तलाव काही दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाला. त्यात भरपूर पाणी असल्यामुळे कुणी खोल पाण्यात जाण्याची हिम्मत केली नाही. आरडाओरडीनंतर अंबाझरी पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार विजय करे आपल्या सहका-यांसह तलावाकडे धावले. अग्निशमन दलाच्या पथकालाही बोलवून घेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आनंदला बाहेर काढले. मात्र आनंदचा मृत्यू झाला होता.

मित्रांना शॉक !
या घटनेने आनंदच्या मित्रांना जबर मानसिक धक्का बसला आहे. आनंदला व्यवस्थीत पोहता येत नव्हते. मात्र, पाण्यात उतरण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांना ‘तूम्ही बघा. गडबड करू नका, आपल्याला अंडरवॉटर मस्ती करायची आहे, असे म्हणत तो नाक दाबून पाण्यात गेला. त्याने सांगितल्यामुळे तो पाण्याबाहेर थोड्या वेळाने येईल, असा कयास बांधून त्याचे मित्र गप्प बसले. मात्र, ५ मिनिटे झाली तरी आनंद पाण्याबाहेर आला नाही. ते पाहून मित्रांनी आरडाओरड केली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आनंद व्दिवेदीचा मृतदेहच पाण्याबाहेर काढला. दरम्यान, आनंदच्या आई आणि भावाला पोलिसांनी ही घटना कळविली. ते नागपूरला येण्यासाठी मुंबईहून निघाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Mumbai IT Engineer has died by drowning in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.