नागपूर नागरिकच्या जागेवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय? हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:10 PM2019-12-17T22:10:28+5:302019-12-17T22:13:28+5:30

गरजू रुग्णांना स्वस्त दरात विशेष व सामान्य वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंभीर दखल घेतली.

Multispecialty Hospital at Nagpur Nagrik Sahakari place? High court order | नागपूर नागरिकच्या जागेवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय? हायकोर्टाचा आदेश

नागपूर नागरिकच्या जागेवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय? हायकोर्टाचा आदेश

Next
ठळक मुद्देसमिती स्थापन करण्यासाठी मागितली नावे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गरजू रुग्णांना स्वस्त दरात विशेष व सामान्य वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे, याकरिता नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाच्या जमिनीवर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. तसेच, यासंदर्भात समिती स्थापन करण्याकरिता वैद्यकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीची नावे सुचविण्याचे आदेश या प्रकरणातील सर्व पक्षकारांना दिले. ही समिती सर्वेक्षण करून सदर मागणी कशी अमलात आणता येईल यावर अहवाल सादर करेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.
याविषयी नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाचे संस्थापक-सदस्य डॉ. बालचंद्र सुभेदार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तर अंबाझरी रोडवर असलेले नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय २०१० पासून बंद आहे. या रुग्णालयाला नागपूर सुधार प्रन्यासची जमीन लीजवर देण्यात आली आहे. ही जमीन निरुपयोगी पडून राहू नये यासाठी लीज करार कसा रद्द करता येईल याची नासुप्रने दोन महिन्यात चौकशी पूर्ण करावी, असे निर्देशदेखील न्यायालयाने दिले.
सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने काही डॉक्टरांनी १९७० मध्ये नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय ही संस्था स्थापना केली. २० ऑक्टोबर १९७८ रोजी नासुप्रने या संस्थेला रुग्णालय सुरू करण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावरील ५८४२.४८ चौरस मीटरचा भूखंड लीजवर दिला. २४ जुलै २००९ रोजी नासुप्रने लीज कराराचे नूतनीकरण करून लीजची मुदत ३१ मार्च २०३२ पर्यंत वाढवून दिली. दरम्यान, २०१० मध्ये रुग्णालय बंद पडले. हे रुग्णालय इतर इच्छुकांना चालवायला देण्याचे प्रयत्नही यशस्वी झाले नाहीत. तसेच, संस्थादेखील रुग्णालयाला पुनरुज्जीवित करू शकली नाही. परिणामी, ती जमीन परत घेऊन तिचा जनहितासाठी उपयोग करावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

साईबाबा सेवा मंडळाला हवी जमीन
गरजू रुग्णांकरिता रुग्णालय चालविण्यासाठी वर्धा रोडवरील साईबाबा सेवा मंडळाला ही जमीन हवी आहे. त्याकरिता मंडळाने या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून त्यांचा उद्देश न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच, आवश्यक आदेश जारी करण्याची विनंती केली. मंडळातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Multispecialty Hospital at Nagpur Nagrik Sahakari place? High court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.