महावितरणचे नियोजन फसले, नागपूरकर रात्रभर अंधारातच बसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 02:55 PM2022-05-14T14:55:27+5:302022-05-14T15:52:17+5:30

पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने वाठोडासह पूर्व नागपुरातील वीज पुरवठा अजूनही ऑक्सिजनवर सुरू आहे.

MSEDCL planning failed, Nagpur residents sat in darkness due to power outage | महावितरणचे नियोजन फसले, नागपूरकर रात्रभर अंधारातच बसले!

महावितरणचे नियोजन फसले, नागपूरकर रात्रभर अंधारातच बसले!

Next
ठळक मुद्देविजेची मागणी ६३० मेगावॅटपर्यंत वाढली : पायाभूत विकासाकडे लक्षच नाही

नागपूर : जीर्ण झालेल्या वीज वितरण यंत्रणेमुळे शहरात विजेचा लपंडाव वाढला आहे. रात्रभर वीज नसणे ही सामान्य बाब झाली आहे. भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार वितरण यंत्रणा सशक्त करण्यात महावितरण अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. एकूणच महावितरणचे नियोजन चुकल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी शहरात ४०० मेगावॅट विजेची मागणी होती. ती आता ६३० मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. महावितरण १० टक्के विजेच्या मागणीच्या वाढीसाठी तयार होते; परंतु नियोजन चुकल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याची बाब आता अधिकारीसुद्धा दबक्या स्वरात मान्य करीत आहेत.

२०११ ते २०१९ पर्यंत शहरातील तीन डिव्हिजन महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स वीज वितरण फ्रॅंचाईजीच्या अंतर्गत होते. या दरम्यान पायाभूत विकासाच्या नावावर नाममात्र काम झाले. २०१९ मध्ये महावितरणने काम सांभाळले; परंतु पुढच्याच वर्षी कोविड संक्रमण सुरू झाले. त्यामुळे निधी मिळाला नाही आणि विकासकामे प्रभावित झाली. त्यानंतर कोविडनंतर उन्हाळ्यात विजेची मागणी ४०० मेगावॅटवरून वाढून ६०० मेगावॅटपेक्षा अधिक झाली. परिणामी, वितरण यंत्रणेवर भार वाढला आणि शहरात ट्रिपिंग व ब्रेकडाऊन वाढले. गेल्या दोन दिवसांत विजेने हाहाकार माजवला आहे. मंगळवारी महापारेषणचे पारडी व बेसा सबस्टेशन ठप्प झाल्याने अर्धे शहर अंधारात होते. बुधवारी रात्री पॉवर ट्रान्सफार्मर खराब झाल्याने पूर्व नागपुरातील बहुतांश भागात अंधार पसरला होता.

केव्हा लागणार नवीन पॉवर ट्रान्सफार्मर

पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने वाठोडासह पूर्व नागपुरातील वीज पुरवठा अजूनही ऑक्सिजनवर सुरू आहे. नवीन पॉवर ट्रान्सफार्मर लागत नाही तोपर्यंत अशीच स्थिती राहील. शहरात हे ट्रान्सफार्मर उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते आमगाव येथून आणले जात आहे. दुसरीकडे महावितरणचे कर्मचारी जुने ट्रान्सफार्मर हटविण्याच्या कामाला लागले आहेत. नवीन ट्रान्सफार्मर आता उद्याच लागू शकेल, असे महावितरणचे म्हणणे आहे.

दोन वर्षांत महावितरणने काय-काय केले ?

- जिल्ह्यात १५५४.१८ किलोमीटर उच्च दाब व ४४७.२७ किलोमीटर लघुदाब लाईन टाकण्यात आली

- ७४.४३ किलोमीटर उच्च दाब व ९८.५२ किलोमीटर लघु दाब लाईन टाकण्यात आली.

- ३२८५ ट्रान्सफार्मर स्थापित करण्यात आले. १८० च्या क्षमतेत वाढ झाली.

- १२ नवीन सबस्टेशन, ४ अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर व पॉवर ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्यात आली.

- नाग भवन येथे नवीन सब स्टेशन सुरू करण्यात आले.

- सेमिनेरी हिल्स, बिनाकी, कामठी रोड येथे १० एमव्हीएचे पॉवर ट्रान्सफार्मर लावण्यात आले.

- काटोल सब स्टेशनच्या पॉवर ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्यात आली.

Web Title: MSEDCL planning failed, Nagpur residents sat in darkness due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.