आईच बनली वैरीण, पोटच्या मुलींना देहव्यापारात ढकलण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 15:48 IST2023-05-22T15:47:23+5:302023-05-22T15:48:17+5:30
पाचपावली पोलिसांच्या पथकाची कारवाई

आईच बनली वैरीण, पोटच्या मुलींना देहव्यापारात ढकलण्याचा प्रयत्न
नागपूर : आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी आई कुठल्याही आव्हानांचा सामना करू शकते असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, नागपुरातील एक आई चक्क आपल्याच पोटच्या मुलींची वैरीण बनली. तिने मैत्रिणीच्या मदतीने दोन अल्पवयीन मुलींना देहव्यापारात ढकलून गोव्यात त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारवाई करीत मुलींची सुटका केली.
पाचपावली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली व टोनी विजय (वय ४०, पंचशीलनगर) या दलालाला अटक केली. टोनी हा एका बारमध्ये कामावर होता व त्याची वेश्या व्यवसायात असलेल्या एका महिलेशी ओळख झाली. दोघेही काही काळाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये सोबत राहायला लागले. त्या महिलेला मोनिका (नाव बदललेले) नावाची मैत्रीण असून, तिची आर्थिक परिस्थितीत बेताचीच आहे. तिला १६ आणि १५ वर्षांच्या दोन मुली आहेत. टोनीच्या प्रेयसीच्या सांगण्यावरून मोनिकादेखील देहव्यापार करायला लागली.
अधिक पैसे मिळविण्याचे आमिष दाखवून टोनीने तिच्या दोन्ही मुलींनादेखील देहव्यापारासाठी विक्री करण्याचा प्रस्ताव दिला. पैशांच्या मोहात मोनिकादेखील तयार झाली. मुलींना तिने याबाबत माहिती दिली; मात्र मुलींचा विरोध होता. तरीदेखील बळजबरीने त्यांना काही ग्राहकांकडे पाठविण्यात आले. या मुलींना टोनी गोव्यात नेणार होता. पाचपावली पोलिस ठाण्याच्या पथकाला ही माहिती मिळाली. त्यानंतर ठाणेदार वैभव जाधव यांच्या सूचनेवरून पीएसआय विकास मनपिया यांच्या पथकाने छापा टाकत टोनीच्या घरातून दोन्ही मुलींची सुटका केली. पोलिसांनी टोनीला अटक केली. त्याची प्रेयसी व मुलींच्या आईलादेखील ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. या प्रकारामुळे पोलिसांनादेखील मोठा धक्काच बसला.