अल्पवयीन मुलीने रचले आपल्याच अपहरणाचे नाट्य; नागपूरवरून गेली चंद्रपुरात अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 18:08 IST2022-10-17T18:06:52+5:302022-10-17T18:08:18+5:30
आई अभ्यासासाठी रागावल्याने सोडले घर

अल्पवयीन मुलीने रचले आपल्याच अपहरणाचे नाट्य; नागपूरवरून गेली चंद्रपुरात अन्..
नागपूर : अभ्यासासाठी रागावल्यामुळे एका १४ वर्षांच्या मुलीने घर सोडून चंद्रपूर गाठले. त्यानंतर आपले दोन महिलांनी कारमधून अपहरण केल्याची खोटी माहिती चंद्रपूर पोलिसांना दिली. परंतु तपासात या मुलीने स्व:तच घर सोडल्याचे निष्पन्न झाले.
नागपूर येथील नंदनवन परिसरात राहणारी १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी शुक्रवारी दुपारी घरून निघाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र तिचा शोधाशोध केली. ती कुठेच न आढळल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. परंतु घरून निघाल्यानंतर मुलीने थेट चंद्रपूर गाठले. तेथे रामनगर ठाण्यात जाऊन दोन महिलांनी कारमधून आपले अपहरण केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
कसेतरी या महिलांच्या तावडीतून आपण बचावल्याची माहिती तिने चंद्रपूर पोलिसांना दिली. परंतु त्यानंतर ही मुलगी स्वत:हून चंद्रपूरला आणि तिने आपल्या अपहरणाची खोटी माहिती दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांना समजले. आईने अभ्यासासाठी रागावल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी नागपुरात तिच्या आईवडिलांशी संपर्क साधून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.