‘लाडकी बहीण’साठी सप्टेंबरपर्यंत दोन कोटींहून अधिक महिला पात्र
By कमलेश वानखेडे | Updated: September 16, 2024 15:04 IST2024-09-16T15:03:49+5:302024-09-16T15:04:38+5:30
आदिती तटकरे : कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिरात घेतले दर्शन

More than two crore women eligible for 'Ladki Baheen' till September
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ दिले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील, असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
अदिती तटकरे यांनी सोमवारी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या विभागाचा अंदाज आहे की अडीच कोटी महिला पर्यंत ही योजना विस्तारली जाईल. सुरुवातीला ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहेत. म्हणून मुदत वाढविली. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत पंधराशे रुपयांचा लाभ पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शक्ती कायद्याच्या बहुतांशी बाबी केंद्राच्या कायद्यात
महिलांची सुरक्षा महत्त्वाचा विषय आहे. मात्र, महिलांसाठीची योजना एक भाग आहे आणि महिलांना सुरक्षितता देणे हा दुसरा भाग आहे. राज्यातील महिला भगिनी सुरक्षित रहाव्या हे सर्वांचेच उद्दिष्ट आहे. यात राजकारण आणण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला होता. महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याच्या बहुतांशी बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आहेत. उर्वरित बाबी आम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत, असेही तटकरे यांनी सांगितले.