अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नेहमीच करायचा पाठलाग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By दयानंद पाईकराव | Updated: October 31, 2023 17:59 IST2023-10-31T17:59:42+5:302023-10-31T17:59:59+5:30
चाकू घेऊन दिली पाहून घेण्याची धमकी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नेहमीच करायचा पाठलाग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपूर : बहिणीसोबत कॉम्प्युटर क्लासला जात असलेल्याा १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी गजाआड केले आहे.
राहुल आशिक पंचेश्वर (वय २०, रा. गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अल्पवयीन मुलीच्याच वस्तीत राहतो. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी राहुल नेहमीच पाठलाग करीत होता. सोमवारी दुपारी १.४५ वाजता आणि सायंकाळी सहा वाजता अल्पवयीन मुलगी कॉम्प्युटर क्लासला जात असताना आरोपी राहुलने तिचा पाठलाग करून तिच्या अंगावरील दुपट्टा ओढून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. मुलीने मनाई केली असता आरोपीने शिवीगाळ करून तिला पाहून घेण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या मुलीने घरी आल्यानंतर कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन तिच्या नातेवाईकांना चाकू दाखवून धमकी दिली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राहुल विरुद्ध कलम ३५४ (ड), २९४, ५०६ (२), सहकलम १२ पोक्सो ॲक्ट सहकलम ४/२५, भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.