नागपुरात लहानग्या बहिणींसह चौघींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:42 IST2019-09-10T20:38:54+5:302019-09-10T20:42:42+5:30
अल्पवयीन बहिणींसह चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी नागपूर शहरातील विविध भागात घडली.

नागपुरात लहानग्या बहिणींसह चौघींचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन बहिणींसह चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी शहरातील विविध भागात घडली. या प्रकरणी सोनेगाव, एमआयडीसी आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनेगावमधील मिहान परिसरात ४ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणी रात्री १० च्या सुमारास घराजवळ सायकल चालवित होत्या. तेथे आलेल्या सतीश रहांगडाले (वय ३०) याने या बालिकांसोबत लज्जास्पद वर्तन केले. बालिकांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळाला. बालिकांनी आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीशला अटक केली.
दुसरी घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसीत घडली. एमआयडीसीतील २४ वर्षीय तरुणीसोबत आरोपी समीर मेंढे (वय ३१, रा. धम्म किर्तीनगर) याची फेसबुकवरून फ्रेण्डशिप झाली होती. त्याच्याशी संपर्क वाढल्यानंतर तो वाममार्गाला असल्याचे तिला कळले. त्यामुळे तिने त्याला टाळणे सुरू केले. त्यामुळे आरोपी मेंढेने तिला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्याने तरुणीने एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी धमकी देऊन विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
तिसरी घटना सायंकाळी ५.३० च्या सुमारास इमामवाड्यात घडली. अजनीच्या रेल्वे वसाहतीत राहणारा गुड्डू ऊर्फ सूरज कुंदन झरबडे आणि १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला टोचून बोलतो. त्याचा असा छळ सुरू असतानाच त्याने सोमवारी सदर युवतीला मारहाण करून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. त्याच्याकडून होणारा छळ आणि अपमान असह्य झाल्याने युवतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.