युरोपमधून परतलेल्या महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : तीन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:52 IST2019-09-18T00:51:47+5:302019-09-18T00:52:28+5:30
युरोपमधून नागपुरात परतलेल्या एका महिलेवर (वय ५८) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओडिशातील तीन आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

युरोपमधून परतलेल्या महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : तीन आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युरोपमधून नागपुरात परतलेल्या एका महिलेवर (वय ५८) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओडिशातील तीन आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. श्रीकांत महतो (वय ३४), सुशांत शाहू (वय ३४) आणि कबिर डेहरा (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित महिला मूळची नागपुरातील रहिवासी असून, ती अनेक वर्षांपूर्वी यूरोपमध्ये (स्विडन) राहायला गेली. ती तेथे एनजीओ चालविते. तिने आपले घर इंद्रजित नामक व्यक्तीला भाड्याने दिले होते. गणेशपेठ बसस्थानकाजवळच्या एका सदनिकेत इंद्रजित राहतो. त्याच्याकडे या महिलेचे काही सामान होते. ते परत घेण्यासाठी रविवारी दुपारी ४. ३० च्या सुमारास पीडित महिला रजत संकुलमधील सदनिकेत गेली. यावेळी इंद्रजितच्या सदनिकेत आरोपी श्रीकांत, सुशांत आणि कबिर होते. इंद्रजितने त्यांना हे सामान महिलेला परत करण्यास सांगितले. आरोपींनी महिलेला घरात बोलविले.त्यांनी महिला घरात येताच आतून सदनिकेचे दार बंद केले आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने आरडाओरड करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे आरोपी घाबरले. महिलेने सदनिकेबाहेर धाव घेत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गणेशपेठ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
मोठा अनर्थ टळला
तक्रार करणारी महिला युरोपमध्ये सामाजिक कार्य करते. तिकडे सामाजिक कार्य करणाऱ्यांचा मान काही औरच असतो. महिला मायदेशी परतली अन् तिच्यावर येथील आरोपींनी अत्याचार केला असता तर या घटनेमुळे मोठी निंदानालस्ती झाली असती. महिलेने प्रसंगावधान राखत आरोपींना हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला.