लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी विधानसभा निवडणूक प्रकरणामध्ये आमदार विकास ठाकरे व प्रवीण दटके यांना समन्स बजावून आठ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
पश्चिम नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याविरुद्ध मतदार प्रीतम खंडाते तर, मध्य नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपा उमेदवार प्रवीण दटके यांच्याविरुद्ध विकास इंडिया पार्टीचे उमेदवार मो. इम्रान मो. हारून कुरैशी यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
दोन्ही विजयी उमेदवारांनी दोन्ही विजयी उमेदवारांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची पायमल्ली केल्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी आणि दोन्ही मतदारसंघामध्ये नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली होती. असे असताना ठाकरे यांनी २८ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास हजारी पहाड येथे सभा घेतली. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले. यासंदर्भात खंडाते यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या, पण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली नाही, असा दावा संबंधित याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. संतोष चव्हाण यांनी बाजू मांडली.
ईव्हीएम भरलेले वाहन बेपत्ता२० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री कोतवाली पोलिस ठाण्यातून मध्य नागपूर मतदारसंघातील ईव्हीएम भरलेले वाहन बेपत्ता करण्यात आले. तसेच, या घटनेपूर्वी भाजपा व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ईव्हीएम यंत्रावरून हाणामारी झाली. त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड केली. परिणामी, आचारसंहितेचा भंग झाला. भारतीय निवडणूक आयोग व कोतवाली पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली नाही. सीसीटीव्ही फुटेज जप्त केले नाही, असा आरोप कुरैशी यांनी केला आहे.