नागपूर : गर्दीच्या ठिकाणी महिला-मुलींच्या मागे जाऊन त्यांच्याशी अश्लिल चाळे करण्याची विकृती जडलेल्या एका 'सायको'ला रेल्वेपोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, त्याने अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असले तरी तो पोलिसांच्या रेकॉर्डवर मात्र आला नव्हता. यावेळी मात्र विनयभंगाची विकृती पाळणाऱ्या या आरोपीला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ २४ तासातच अटक केली.
जितेंद्र विजय लारोकर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो गोंदियाच्या पैकनटोळी भागातील रहिवासी आहे. रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गाैरव गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३० वाजता विदर्भ एक्सप्रेस नेहमीप्रमाणे दुपारी ४.३० वाजता नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर आली. जनरल कोचमधून एक उच्चशिक्षित तरुणी फलाटावर उतरत असताना गर्दीचा फायदा घेत एक भामटा तिच्या मागे आला आणि तिच्याशी त्याने आक्षेपार्ह्य वर्तन केले. या अनपेक्षित प्रकारामुळे तरुणी घाबरली आणि मोठ्याने ओरडली. त्यामुळे आजुबाजूच्या प्रवाशांनी तिची विचारपूस केली. दरम्यान गर्दीचा फायदा उठवत आरोपी पळून गेला. या प्रकरणाची तक्रार पीडित तरुणीने रेल्वे पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याची माहिती कळताच रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने हुडकून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिस निरीक्षक गावंडे आणि सहकाऱ्यांनी फलाटावरील सीसीटीव्हीचे फुटेज बघून आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली. सीसीटीव्हीतील फुटेजनुसार तो पूर्वकडील गेट, कॉटन मार्केट साईडने गेल्याचे दिसून आल्याने त्या भागावर पोलिसांनी खबरे पेरले.
दरम्यान, आज दुपारी आरोपी त्याच भागातून रेल्वे स्थानकाकडे येत असल्याचे दिसल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला जेरबंद केले. गुन्हा घडल्यानंतर कोणतीही माहिती अथवा पुरावा नसताना आरोपीला अवघ्या २४ तासात अटक करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात हवलदार प्रशांत उजवणे, श्रीकांत उके, चंद्रकांत भोयर, भूपेश घोंगडी, राहुल गवई, धम्मपाल गवई, मजहर अली यांनी बजावली.
'तो मी नव्हेच'ची भूमिका
प्रारंभीच्या चाैकशीत पोलिसांना 'तो मी नव्हेच' असे सांगणाऱ्या या आरोपीने नंतर मात्र या गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर आरोपीने यापुर्वीदेखिल अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचेही सांगितले. काम नसताना तो रेल्वेने विनाकारण गोंदिया ते नागपूर प्रवास करायचा. रेल्वेत चढताना अथवा उतरताना महिला मुलींच्या मागे जाऊन विकृत चाळे करायचा, असेही चाैकशीतून पुढे आले.