विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार; माजी नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:59 IST2025-10-18T17:57:47+5:302025-10-18T17:59:14+5:30
शासकीय निधीचा अपहार : कामठी शहरातील प्रकार

Misappropriation of government funds in the name of development works; Case registered against former mayor, vice-president, and chief officer
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी कामठी नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष मोहम्मद शाहजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष अहफाज अहमद अब्दुल शकूर, नगरसेविका रमा नागसेन गजभिये आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
सन २०२१ मध्ये कामठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे मोहम्मद शाहजहाँ शफाअत अन्सारी व उपाध्यक्षपदी अहफाज अहमद अब्दुल शकूर, तर मुख्याधिकारीपदी संदीप बोरकर कार्यरत होते, तर रमा गजभिये या बसपच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या कार्यकाळात सन २०२१ मध्ये कामठी शहरातील प्रभाग क्रमांक १, ३, ४, ५, ७, ८, १०, ११, १२, १३, १४ आणि १६ मध्ये अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, सिमेंट नाल्यांची दुरुस्ती व बांधकाम, एच. पी. नाली, नाल्यांचे कव्हर, पेव्हिंग ब्लॉक, कल्व्हर्ट व फ्लोरिंग आदी विकास कामांना सुरुवात करण्यात आली. या सर्व कामांचे कंत्राट पारस इंटरप्रायजेस नामक कंत्राटदार कंपनीला देण्यात आले होते.
या कंपनीने ही सर्व कामे पूर्ण न करताच या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ती पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविले. कामे अर्धवट असताना कंत्राटदाराला पूर्ण कामांची बिले देण्यात आली. ती कंत्राटदार कंपनी ही नगराध्यक्ष मोहम्मद शाहजहाँ शफाअत अन्सारी यांच्या मालकीची आहे. त्यांच्यासह उपाध्यक्ष अहफाज अहमद अब्दुल शकूर, नगरसेविका रमा गजभिये आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी संगनमत करून ही बिले कंत्राटदार कंपनीला दिली. त्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी राजकीय प्रभावाचा वापर केला, असेही काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र शर्मा यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.
भ्रष्टाचार बोकाळला
कामठी नगरपालिकेच्या राजकारणात मागील दीड दशकापासून गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. ही मंडळी प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करते व त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून निधीची अफरातफर करीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. काही राजकीय नेते या लोकांना पाठीशी घालत असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या असून, पालिकेतील प्रत्येक विकास काम आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
न्यायालयीन चौकशीनंतर गुन्ह्यांची नोंद
परेंद्र शर्मा यांनी या प्रकारासंदर्भात सन २०२१ मध्येच पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने त्यांनी शेवटी न्यायालयात दाद मागितली. प्राथमिक चौकशी केली आणि २ न्यायालयाने या प्रकरणाची त्यानंतर पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच कामठी (जुनी) पोलिसांनी त्या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२० (बी), १६६, १९२, २०१, २१२, २१८, ४०९, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला.
"या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार केला जाणार असून, त्यांच्या सूचनानुसार संबंधितांची योग्य चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल."
- प्रशांत जुमडे, ठाणेदार, कामठी (जुनी)