अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळाली, अठराची झाल्यावर पोलिसांना आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 13:46 IST2022-06-23T13:40:58+5:302022-06-23T13:46:04+5:30
आता मुलगी अठरा वर्षांहून अधिक वयाची झाली असून, ‘मला पतीसोबत राहायचे’ अशी तिची भूमिका असल्याने पोलीसदेखील ‘क्या करे क्या ना करे’ अशा बुचकळ्यात पडले आहेत.

अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळाली, अठराची झाल्यावर पोलिसांना आढळली
नागपूर : शेकडो किलोमीटरवर दूर राहणाऱ्या एका मुलाशी व्हिडीओ कॉलवर मैत्री झाली... फोनवर लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ‘तुमने पुकारा और हम चले आए’ असे म्हणत अल्पवयीन असूनदेखील घरदार सोडून त्याच्या विश्वासावर कराडला निघून गेली आणि त्याच्याशी साताजन्मांचे फेरेदेखील घेतले.
माहेरच्या लोकांनी दीड वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीवर पोलिसांना आता यश मिळाले आणि मुलीचा शोध लागला. परंतु आता मुलगी अठरा वर्षांहून अधिक वयाची झाली असून, ‘मला दादल्यासोबत राहायचे’ अशी तिची भूमिका असल्याने पोलीसदेखील ‘क्या करे क्या ना करे’ अशा बुचकळ्यात पडले आहेत. एखाद्या सिनेमाची ‘स्क्रीप्ट’ वाटेल अशा या घटनेमुळे माहेरच्यांना मात्र दीड वर्षांनी मुलीचा शोध लागला आहे.
२७ ऑक्टोबर २०२० रोजी एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. बेलतरोडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्याने तपास मानवी तस्करी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. मुलगी सातारा येथील कराड येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. एक पथक साताऱ्याला पाठविण्यात आले. तेथे सागर अवघड याच्या घरात ती आढळून आली. तिने सागरशी लग्न केले असल्याचे सांगत, पोलिसांसोबत जाण्यासही नकार दिला. मात्र अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी तिला सागरसह नागपुरात आणले. आता ती अठरा वर्षांची असल्याने पोलिसांचीही कोंडी झाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ते पुढील कारवाई करणार आहे. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मंदा मनगटे, एपीआय गजानन चांभारे, ज्ञानेश्वर ढोके, मनीष पराये, राजेंद्र टकले, आरिफ शेख, आरती चव्हाण, पल्लवी वंजारी यांनी ही कारवाई केली.
अशी झाली मैत्री
एका कॉमन फ्रेंड प्रियकराच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीची सागरशी मैत्री झाली. दोघेही व्हिडीओ कॉलिंगवर बोलू लागले. त्यांच्यात प्रेम निर्माण झाली. सागरने तिला कराड येथे येण्यास सांगितले. तिने कसलाही विचार न करता थेट कराड गाठले. अल्पवयीन असूनदेखील तिने सागरसोबत लग्न केले.