नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अधिवेशन संपूनही हे सरकार मंत्र्यांना खातेवाटप करू शकले नाही. ज्या सरकारचे मंत्री अधिवेशनातील सहा दिवस विनाखात्याने वावरले, त्या सरकारकडून जनतेला काही मिळण्याची अपेक्षा काय? असा खोचक टोला विरोधकांनी महायुती सरकारला लगावला.
अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना संबोधित केले. राज्यात परभणीच्या घटनेतून असंतोष आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे भडका उडाला. बीडमध्ये सरपंचाच्या मृत्यूला कारणीभूत असलेले वाल्मीक कराड एका मंत्र्याचा निकटवर्तीय आहे.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला, कल्याणमध्ये मराठी माणसावरील हल्ला, वर्षभरात ४५ हजार महिलांवर झालेल्या अत्याचार, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असताना, हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा व पोलिसांचा बचाव करीत, जनतेवर अन्याय करीत आहे. कायद्याचे भक्षकच सरकारमध्ये असतील तर काय अपेक्षा करणार? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. मागच्या सरकारच्या काळातील खोट्या योजना व आश्वासनापुरतेच खोटे अधिवेशन झाले. हे सरकार येणाऱ्या काळात जनतेला न्याय देईल, अशी अपेक्षाच नाही. विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल, असा दावा दानवे यांनी केला.
या अधिवेशनाचे काहीच फलित नाही
नव्या सरकारला जनतेने भरभरून मतदान केल्याने, जनतेच्या अपेक्षांची पहिल्याच अधिवेशनात पूर्ती होईल, अशी अपेक्षा होती.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा सरकार करेल, असे वाटले होते. मात्र, हे सरकार शेतकरी, युवक, गरिबांचे नाही.
जनतेच्या आशा-आकांक्षा या अधिवेशनातून पूर्ण होऊ शकल्या नाही.
या अधिवेशनाचे काहीच फलित निघाले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
शरद पवार गटाचे नेते अनुपस्थित
एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा 'मविआ'तील घटकपक्ष उद्धवसेनेचे नेते करीत आहे.
अधिवेशन संपले तरी मविआने विरोधी पक्षनेता ठरविलेला नाही, अशात विरोधकांच्या पत्रपरिषदेत शरद पवार गटाचे नेते उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीतही एकमत नसल्याची चर्चा होती.
यासंदर्भात पटोले यांना विचारल्यावर ते म्हणाले, जयंत पाटील यांचे विमान असल्याने ते निघून गेले.
महायुतीत एकमेकांविरोधात किती रोष आहे, हे त्यांना विचारा, असे सांगून प्रश्नाला बगल दिली.