मेट्रो रेल्वे कामठी, कन्हान, कळमेश्वरला जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:43 IST2018-05-15T22:39:45+5:302018-05-15T22:43:35+5:30
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रतीक्षित दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर दोन आठवड्यात तयार होणार आहे. हा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

मेट्रो रेल्वे कामठी, कन्हान, कळमेश्वरला जोडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रतीक्षित दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर दोन आठवड्यात तयार होणार आहे. हा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर शहरासाठी वेगात सुरू आहे. नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्णय घेत विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या विकास आराखड्यात कामठी, कन्हान, कळमेश्वरला मेट्रो रेल्वे सेवेत जोडण्यात येणार आहे. याशिवाय आसपासच्या गावांनाही मेट्रो सेवेत जोडण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तेथील लोकांना ये-जा याची सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय गावांच्या सर्वांगीण विकासाला मदत मिळेल.
काही दिवसांपूर्वी महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यासंदर्भात शासकीय-निमशासकीय, खासगी संस्था आणि सल्लागार एजन्सींनी सहभागी होऊन सूचना आणि प्रस्ताव सादर केले होते. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, सीपीडब्ल्यूडी, एनएचएआय, कामठी कॅन्टॉनमेंटचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. सर्वांची सहमती लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव तयार करून त्याच्या स्वीकृतीसाठी अंतिम प्रारूप दिले आहे. भविष्यात नागपूर जिल्हा सॅटेलाईट टाऊनशिप स्वरूपात दिसणार आहे.