मेडिकल : एनएमसी विरोधात निवासी डॉक्टरांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:19 IST2019-08-01T20:18:35+5:302019-08-01T20:19:29+5:30
‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) बुधवारी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले आहे. गुरुवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर निवासी डॉक्टरांनी हातात फलक घेऊन जोरदार नारेबाजी केली.

मेडिकल : एनएमसी विरोधात निवासी डॉक्टरांची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) बुधवारी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले आहे. गुरुवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर निवासी डॉक्टरांनी हातात फलक घेऊन जोरदार नारेबाजी केली.
मेडिकल मार्डचे शुभम इंगळे म्हणाले, जुन्या विधेयकानुसार खासगी मेडिकल कॉलेजमधील ८५ टक्के जागांवर शासनाचे नियंत्रण असायचे. परंतु नवा कायदा ‘एनएमसी’मुळे आता केवळ ५० टक्के जागांवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. उर्वरित ५० टक्के जागांवरील शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य त्या कॉलेजेसना देण्याची तरतूद आहे. यामुळे गरीब घरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महागणार आहे. नव्या कायद्यात ‘ब्रीजकोर्स’ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ‘बीएएमएस’ डॉक्टरांनी हा ‘कोर्स’ केल्यास त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमामध्ये एकच परीक्षा असणार आहे. यामुळे यात भ्रष्टाचार फोफावून गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, म्हणूनच ‘मार्ड’ने या कायद्याला विरोध केला आहे. तूर्तास तरी संपाचा विचार नाही. ‘सेंट्रल मार्ड’ने तशा सूचना केल्यास कामबंद आंदोलनही उभारले जाईल, असेही इंगळे म्हणाले. यावेळी २०० वर निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर हातात फलक घेऊन ‘एनएमसी’ विधेयकाच्या विरोधात निदर्शने करीत लक्ष वेधले.