लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रेल्वे स्थानकावर ७० रुपयांत पोटभर जेवण मिळेल, अशी बातमी रेल्वेच्या 'एक्स'वर झळकल्याने प्रवासी खूष झाले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे स्थानकावर, ट्रेनमध्ये त्याची सुरूवातच झाली नसल्याने आणि ती कधी होणार, हे देखिल स्पष्ट नसल्याने प्रवासी सध्या 'ढूंढते रह जाओंगे'चा अनुभव घेत आहेत.
भारताची लोकवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेत रोज कोट्यवधी नागरिक प्रवास करतात. त्यातील ८० ते ९० टक्के प्रवासी घरून जेवण सोबत घेत नाहीत. रेल्वे गाडी अथवा रेल्वे स्थानकावर मिळेल ते खाऊन ही मंडळी प्रवास करतात. ते लक्षात घेता भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टूरिजम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) तर्फे रेल्वे स्टेशनवर ७० रुपयांत आणि ट्रेनमध्ये ८० रुपयांत प्रवाशांना जेवण दिले जाणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात 'एक्स'वर आली होती. त्यात 'मेन्यू' कोणता राहणार, ते देखिल स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, भात (प्लेन राईस १५० ग्राम), डाळ किंवा सांबार (१५० ग्राम), दही (८० ग्राम) २ पराठे किंवा चार पोळ्या (१०० ग्राम) भाजी (१०० ग्राम) आणि लोणचे (१२ ग्राम) दिले जाणार होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडूनही या बातमीला गेल्या आठवड्यात दुजोरा मिळाला होता.माफक किंमतीत पोटभर जेवण मिळणार असल्याच्या या 'गूड न्यूज'मुळे कोट्यवधी रेल्वे प्रवासी हुरळले होते. तेव्हापासून (साधरणत: एक आठवड्यापासून) शेकडो प्रवासी रेल्वे स्थानकावर रोज हे ७० रुपयांचे जेवण शोधतात. मात्र, त्यांना ते जेवण कुठेही आढळत नाही. स्टेशनवरील 'फूड स्टॉल'वाले आणि ट्रेनमधील वेंडर्सदेखिल या जेवणाबाबत अनभिज्ञता व्यक्त करतात. अर्थात् ७० आणि ८० रुपयांचे हे जेवण सध्या प्रवाशांना 'ढूंडते रहे जाओंगे'ची प्रचिती देत आहे.
'जेवणाची फक्त चर्चाच'
या संबंधाने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्याकडे वारंवार संपर्क करूनही बोलणे झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना नेमके हे भोजन कधीपासून उपलब्ध होणार, ते स्पष्ट होऊ शकले नाही. दुसऱ्या एका संबंधितांकडे विचारणा केली असता त्यांनी 'जेवणाची फक्त चर्चाच' सुरू आहे. अद्याप तशी काही अधिसूचना ईकडे आली नसल्याचे म्हटले आहे.