'एम्स'मधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; डायरीद्वारे समजेल कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:34 IST2025-08-05T14:30:46+5:302025-08-05T14:34:13+5:30

वसतिगृहात घेतला गळफास : पहिल्या दहा हुशार विद्यार्थ्यांमध्ये संकेत

MBBS student at AIIMS commits suicide; Will the reason be understood through his diary? | 'एम्स'मधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; डायरीद्वारे समजेल कारण?

MBBS student at AIIMS commits suicide; Will the reason be understood through his diary?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूरः
'एम्स'मधील एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने तेथील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


संकेत पंडितराव दाभाडे (२३) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. संकेत हा मूळचा परभणीतील जिंतुरचा रहिवासी होता. तो वसतिगृहात खोली क्रमांक ९०९ मध्ये राहत होता. शनिवारी दुपारपासून तो कुणालाच दिसला नव्हता. रविवारी सकाळीही संकेत एकाही मित्राला दिसला नाही. तो आराम करत असल्याचे वाटल्याने मित्रांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंतदेखील तो खोलीबाहेर आला नाही. तो मोबाइलदेखील उचलत नव्हता. अखेर वसतिगृहाचे वॉर्डन पंकज जिभकाटे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या चाबीने खोली उघडली. खोली उघडताच संकेत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने बाथरूमच्या दरवाजावर शाल बांधून गळफास घेतला होता. सोनेगाव पोलिस ठाण्याला व कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. एम्सचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत जोशी तेथे पोहोचले. संकेतने आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या खोलीत कुठलीही सुसाईड नोट आढळलेली नाही. त्याचे वडील शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे. बहीण आयुर्वेद डॉक्टर आहे. 


पहिल्या दहा हुशार विद्यार्थ्यांमध्ये संकेत
डॉ. जोशी यांनी 'लोकमत'ला सांगितले, पहिल्या दहा हुशार विद्यार्थ्यांमध्ये संकेत होता. त्याच्या आत्महत्येचा घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ज्या शिक्षकाकडे या विद्यार्थ्यांची जबाबदारी होती त्या शिक्षकाने नुकतीच त्याची भेट घेतली होती. परंतु या भेटीतून तो आत्महत्या करेल अशी कुठलीच बाब समोर आली नाही. त्याच्या वडिलांशी बोलल्यावर असे कळले की, तो स्वतःहून घरी फोन करीत नव्हता. घरचे लोकच त्याला फोन करायचे. तो डायरी लिहायचा. सध्या ही डायरी पोलिसांच्या ताब्यात आहे. या डायरीतूनच आत्महत्येचे कारण कळू शकेल, असेही डॉ. जोशी म्हणाले.

Web Title: MBBS student at AIIMS commits suicide; Will the reason be understood through his diary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.