नागपूरजवळ स्फोटक कंपनीत भीषण स्फोट, १८ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 04:31 IST2026-03-02T04:31:18+5:302026-03-02T04:31:31+5:30

२३ कामगार जखमी : काटोल हादरले, मृतदेह शोधण्यासाठी नातेवाइकांची धडपड

Massive explosion at explosives company near Nagpur, 18 killed | नागपूरजवळ स्फोटक कंपनीत भीषण स्फोट, १८ जण ठार

नागपूरजवळ स्फोटक कंपनीत भीषण स्फोट, १८ जण ठार

योगेश पांडे / जितेंद्र ढवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी’ या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भीषण स्फोट होऊन १८ कामगारांचा मृत्यू झाला, तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये सर्वाधिक महिला आहेत. डेटोनेटर्स  बनविणाऱ्या या कंपनीत ‘नोनल क्रिम्पिंग’ युनिटमध्ये ‘डेटोनेटर्स सेल’च्या पॅकिंगचे काम सुरू होते. सकाळी सव्वासातला तेथे स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. या युनिटमधील ४० कामगारांपेकी १८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य युनिटमधील कामगार जखमी झाले. 

स्फोटाचे कारण अस्पष्टच, चौकशी सुरू
 स्फोट नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे ‘पेसो’ तसेच राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा विभागाच्या तपासणीतून समोर येईल. घटनास्थळाची फॉरेन्सिक चौकशीदेखील सुरू आहे व पथकदेखील तेथे पोहोचले. एसडीआरएफ व अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने येत मदतकार्याला सुरुवात केली. या स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट असून चौकशी सुरू आहे. काही मृतकांची ओळख डीएनए चाचणीनंतरच पटू शकेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

नातेवाइकांचा आक्रोश, नाव जाणून घेण्यासाठी धडपड
स्फोटात नेमके कोण जखमी झाले आहे व कोण वाचले आहे, याची माहितीच कळत नव्हती. आपल्या जीवलगांची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी नातेवाइकांची धडपड सुरू होती. जखमींची यादी जारी करण्यात आली. मात्र, मृतकांमध्ये कुणाचा समावेश आहे हे दुपारपर्यंत कळले नव्हते. अधिकृत यादी न आल्याने कामगारांचे नातेवाईक भर उन्हात कंपनीसमोर उभे असल्याचे दिसून आले.

कंपनीचा दावा, कुठलेही सक्रिय उत्पादन सुरू नव्हते
या प्रकरणात ‘एसबीएल’ कंपनीकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. जेथे स्फोट झाला तेथे कुठलेही सक्रिय उत्पादन कार्य सुरू नव्हते, असा दावा कंपनीने केला आहे. स्फोटाचे नेमके कारण काय आहे, याचा शोध सुरू आहे. जखमींना चांगले उपचार मिळावे यावर आमचा भर असून, मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक आर्थिक मदत करण्यात येईल. अंतर्गत चौकशी सुरू केली असून, त्याच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील पावले उचलण्यात येतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ही आहेत मृतकांची नावे
पायल गजभिये,  मीना उईके, प्रतिभा वाळके,  दुर्गा गायकवाड,  शोभा तापसे, अनुसया पाटील, सुनीता सलामे, ज्योत्स्ना शेंद्रे, मंगेश्री येस्कर, संगीता पंचांभाई, गोपी किशोर कोवे,  सुनंदा चिंचखेडे,  सविता काळमेघ,  गणेश टोंगे, राजेंद्र कुळमेथे,  प्रेमदास बागडे.

सात लाखांची मदत, सखोल चौकशी होणार

मृतांच्या वारसांना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये व जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तर राज्य शासनाकडूनदेखील पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. हा स्फोट दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त 
करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title : नागपुर के विस्फोटक कारखाने में भीषण विस्फोट, 18 की मौत, कई घायल

Web Summary : नागपुर के पास एक विस्फोटक कारखाने में भीषण विस्फोट से 18 लोगों की मौत हो गई और 23 घायल हो गए। विस्फोट डेटोनेटर इकाई में पैकेजिंग के दौरान हुआ। कारणों का पता लगाने के लिए जांच जारी है। केंद्र और राज्य सरकारों द्वारा पीड़ितों के परिवारों के लिए वित्तीय सहायता की घोषणा की गई है।

Web Title : Massive Explosion at Nagpur Explosives Factory Kills 18, Injures Many

Web Summary : A devastating explosion at an explosives factory near Nagpur claimed 18 lives and injured 23. The blast occurred in the detonator unit during packaging. Investigations are underway to determine the cause. Financial assistance has been announced for the victims' families by both central and state governments.