शहीद पोलिसांचा २४ तासांत चुकविला हिशेब
By नरेश डोंगरे | Updated: February 22, 2023 00:24 IST2023-02-22T00:23:49+5:302023-02-22T00:24:49+5:30
दरेकसा दलमने घेतला 'त्या' पोलिसांचा बळी : राणू आणि देवचंद मास्टरमाईंड

शहीद पोलिसांचा २४ तासांत चुकविला हिशेब
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नक्षलवाद्यांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आपण सक्रिय असल्याचे दाखविण्यासाठी नक्षल्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेजवळच्या बोरतलावमध्ये दोन पोलिसांना ठार मारले. तर, अवघ्या २४ तासांत या घटनेचा जसाच्या-तसा बदला चुकवून सुरक्षा दलाने दोन नक्षल्यांना ठार मारत शहीद पोलिसांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.
नक्षल्यांच्या विरोधात सुरक्षा दलाने महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरात जोरदार कामगिरी बजावली आहे. नक्षल्यांचा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह अनेकांचे एनकाउंटर आणि अनेक जहाल नक्षल्यांची धरपकड केल्यामुळे नक्षल्यांचे मनोबल खचले आहे. अनेक नक्षलवादी पकडले जात असून, अनेक जण आत्मसमर्पणही करीत आहेत. या प्रकारामुळे नक्षलवादी पुरते बॅकफुटवर गेले असून, नक्षल चळवळीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्यासाठी महाराष्ट्र - छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव क्षेत्रात हवालदार राजेशकुमार सिंह आणि कॉन्स्टेबल ललितकुमार यांच्यावर अंधाधूंद गोळीबार करून त्यांचा घात केला.
या घटनेनंतर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या नक्षलविरोधी सुरक्षा दलाने जोरदार अभियान राबवून हा हल्ला करणाऱ्या नक्षल्यांना त्याच भागात घेरले. यावेळी झालेल्या जोरदार चकमकीत दोन नक्षलवादी ठार मारले गेले. त्यांचे काही साथीदार जखमी झाले, ते पळून गेले तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठा दारूगोळाही जप्त केल्याची माहिती आहे. या संबंधाने विस्तृत माहितीसाठी राजनांदगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक मीना यांच्याशी लोकमतने वारंवार संपर्क केला. मात्र, माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, राजेशकुमार आणि ललितकुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या नक्षल दलमचा छडा लागल्याचे शीर्षस्थ अधिकारी सांगत आहेत. त्यानुसार, हा हल्ला दरेकसादलमने केल्याचे समजते. नक्षल चळवळीचे अस्तित्व दाखविण्यासाठी पोलिसांवर हल्ला करण्यात आला असून, कमांडर राणू आणि देवचंद हे दोघे या हल्ल्याचे मास्टर माईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हुडकून काढण्यासाठी तीनही राज्यात जोरदार शोधमोहीम सुरू असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 'लोकमत'ला दिली.
...'ते' साधे पोलिस होते, निशस्त्र होते !
नक्षलविरोधी अभियानातील पोलिसांवर हल्ला चढविण्याची एकही संधी नक्षलवादी चुकवीत नाहीत. त्यांच्यासोबत नेहमीच सुरक्षादलाच्या चकमकी सुरू असतात. मात्र, नक्षलविरोधी अभियानाचा संबंध नसताना आणि त्या पोलिसांकडे कोणतेही शस्त्र नसताना नक्षल्यांनी निशस्त्र पोलिसांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे पुन्हा नक्षलविरोधी सूर उमटला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"