"मराठा समाजाच्या समितीत त्यांचेच प्रतिनिधि चालले पण ..." शरद पवारांच्या भूमिकेवर भुजबळांकडून प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:01 IST2025-09-19T15:51:15+5:302025-09-19T16:01:07+5:30

Nagpur : अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पाठबळ देणारे त्यांचेच आमदार

"Maratha community's representatives were in the committee but..." Bhujbal questions Sharad Pawar's role | "मराठा समाजाच्या समितीत त्यांचेच प्रतिनिधि चालले पण ..." शरद पवारांच्या भूमिकेवर भुजबळांकडून प्रश्नचिन्ह

"Maratha community's representatives were in the committee but..." Bhujbal questions Sharad Pawar's role

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणासाठी समिती नेमली होती. या समितीचे शरद पवार हे मार्गदर्शक होते. त्या समितीत फक्त मराठा समाजाचेच प्रतिनिधी होते. तेव्हा पवार काही बोलले नाही. आणि आता ओबीसी समितीमध्ये दुसऱ्या समाजाचे लोक नाहीत, असे वक्तव्य ते करीत आहेत. त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही, असे सांगत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची कार्यकर्ता संवाद बैठक गुरुवारी नागपुरातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात पार पडली. यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. 

 भुजबळ म्हणाले, समाजात भांडणे लागू नये म्हणून भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला शरद पवार देत आहेत. मात्र, ज्यावेळी आपण शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्ष व सर्वपक्षीय मीटिंग बोलावली. मग त्यात शरद पवार का आले नाहीत. विरोधी पक्षाचे लोक का आले नाहीत, असा सवाल भुजबळ यांनी केला. मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू असताना रात्रीतून कट रचण्यात आला. शरद पवार यांच्या आमदारांनी त्याला पाठबळ दिले. घराच्या छतांवर दगड नेऊन ठेवण्यात आले. पोलिसांवर दगडफेक केली. नंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला म्हणून शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे तेथे भेटायला गेले. त्यामुळे जरांगे मोठे झाले, असा हल्लाबोल भुजबळ यांनी केला. तुम्ही मंडल आयोग लागू केला म्हणून मी शिवसेना सोडून तुमच्यासोबत आलो; पण आता आमचे आरक्षण जात असेल तर तुम्ही बोलायला नको का, असा सवालही त्यांनी पवार यांना केला.

बैठकीला पंकज भुजबळ, बाळासाहेब कर्डक, ईश्वर बाळबुधे, अरुण पवार, दिवाकर गमे, वसंतराव मगर, दिलीप अण्णा खैरे, जावेद पाशा, प्रा. सत्यजित बोंडे आदी उपस्थित होते.

फडणवीस हे आशेचे किरण

मराठा समाजाला दिलेले बनावट प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळात आता फडणवीस हेच आशेचे किरण आहेत, असे भुजबळ म्हणाले. 

न्यायालयीन लढाई लढू

मराठा ही एक जात आहे; पण ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत. सरकारच्या जीआरमुळे त्या प्रत्येक जातीचे नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही कुणबी, माळी, वंजारी समाजाच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. दोन-चार दिवसांत त्याच्यावर सुनावणी होईल. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असेही भुजबळ म्हणाले.

ओबीसींची ताकद दाखवू

सरकार कुणाच्या दबावाखाली येऊन आमचा हक्क हिरावत असेल तर आम्हीही ओबीसींची ताकद दाखवून देऊ, असा इशारा देत जरांगे यांना जो कुणी पाठबळ देईल त्याला निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार करा. ओबीसींचा आवाज बुलंद करण्यासाठी एकजूट ठेवा व आवाज देईल तेव्हा दिल्ली, मुंबई किंवा म्हणेल तिथे येण्याची तयारी ठेवा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

"भुजबळ परिपक्व नेते आहेत. जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता, ओबीसींवर अन्याय झाला म्हणतात पण सरकार तुमचे आहे. मंत्रीमंडळ बैठकीत तुम्ही ओबीसी अन्यायावर चर्चा करत नाही. पोलीसांवर झालेल्या दगडफेकीचे मी समर्थन करत नाही, पण तिथे असलेल्या मायभगिनींची डोकी फुटली होती, ती कोणत्या जाती धर्माची होती ते बघू नका. त्यावेळी जरांगेच्या मागे एकनाथ शिंदे आहेत असा संशय घेतला गेला होता. भुजबळ राजकारणासाठी समाजात द्वेष पसरवित आहेत."
- शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट

Web Title: "Maratha community's representatives were in the committee but..." Bhujbal questions Sharad Pawar's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.