नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:08 IST2025-09-20T13:06:45+5:302025-09-20T13:08:56+5:30
Nagpur : कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर मनोज जयस्वाल यांना शुक्रवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली. सीबीआयच्या कोलकाता येथील पथकाने नागपुरात येऊन ही कारवाई केली.

Manoj Jaiswal arrested in Nagpur, CBI takes action in hotel; What is the case worth Rs 4000 crore?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर मनोज जयस्वाल यांना शुक्रवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली. सीबीआयच्या कोलकाता येथील पथकाने नागपुरात येऊन ही कारवाई केली. ही कारवाई सीबीआयकडून गुप्त ठेवण्यात आली होती. नेमक्या कुठल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली हेदेखील सांगण्यात आले नाही. मात्र, २०२२ साली त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भातच ही कारवाई करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयचे कोलकाता येथील पथक शुक्रवारी नागपुरात आले. त्यानंतर जयस्वाल यांच्या निवासस्थानी पथक पोहोचले. एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेत अटक केली. सीबीआयचे पथक कोलकाता येथे त्यांची चौकशी करणार आहे. नागपुरातील पथकाला केवळ कारवाईची माहिती देण्यात आली. मात्र, इतर माहिती येथील अधिकाऱ्यांकडेदेखील नव्हती. जयस्वाल हे प्रमोटर असलेल्या कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड या कंपनीचे कोलकाता येथील सॉल्ट लेक येथे मुख्यालय आहे.
संबंधित कंपनीने विविध बँकांकडून बोगस दस्तऐवजांच्या आधारे ४ हजार ३७ कोटींचे कर्ज उचलले होते. यासंदर्भात युनियन बैंक ऑफ इंडियाचे तत्कालीन उपमहाव्यवस्थापक टी. दीना दयाल यांच्या तक्रारीवरून जयस्वाल यांच्यासह १४ जणांविरोधात २० डिसेंबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. ईडीनेदेखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ही कारवाई झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सीबीआयच्या नागपुरातील अधिकाऱ्यांनी याबाबत नेमकी माहिती नसल्याचे स्पष्ट केले.