राजकीय दलालांचा बंदोबस्त करा
By Admin | Updated: March 15, 2015 02:11 IST2015-03-15T02:11:37+5:302015-03-15T02:11:37+5:30
पोलीस ठाण्यांमध्ये मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कथित ‘दलालां’वर कठोर कारवाई करा, ...

राजकीय दलालांचा बंदोबस्त करा
नागपूर : पोलीस ठाण्यांमध्ये मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कथित ‘दलालां’वर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेला दिले. शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी एकत्रित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
१० मार्च रोजी नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्यास लाच घेताना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. फडणवीस यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के.के. पाठक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी आपल्या वागणुकीतून सर्वसामान्यांच्या मनात निर्भयतेचे व विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि त्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये वाढलेल्या राजकीय दलालांच्या सक्रियतेकडेही लक्ष वेधले. हे दलाल कुठल्याही पक्षांचे असो त्यांना सोडू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अवैध दारुविक्री, सट्टाबाजार, रेती माफियांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. यासह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भातील इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. बैठकीला सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह इतरही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)