दुचाकी एकमेकींवर धडकताच वाद पेटला अन् तरुणाला ठार केले; कळमन्यातील थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:43 IST2023-01-09T10:41:33+5:302023-01-09T10:43:10+5:30
पोलिसांनी आरोपीला पकडले

दुचाकी एकमेकींवर धडकताच वाद पेटला अन् तरुणाला ठार केले; कळमन्यातील थरारक घटना
नागपूर : दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर वाद पेटला. त्यातून एका तरुणाला जागेवरच चाकूचे सपासप वार करून ठार मारण्यात आले. ही थरारक घटना कळमनामधील गुलमोहरनगर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले हाेते. आरोपीचे नाव विनय साहू असून तो व्यवसायाने हमाल आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अजय ऊर्फ लक्ष्मी नारायण चंदानिया (२२) असे मृताचे नाव आहे. तो संत रविदासनगर, कामठी येथील रहिवासी होता. आरोपी साहू भाचाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक खरेदी करण्यासाठी दुकानात जात होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या अजयच्या दुचाकीसोबत त्याच्या दुचाकीची धडक झाली. त्यामुळे अजयने साहूला भरपाई मागितली. साहूला मारहाण केली. त्यामुळे साहूचा पारा चढला. त्याने अजयवर चाकूचे वार करून त्याला जागेवरच ठार केले. चाकू अजयचा होता. त्याच्याकडून चाकू हिसकावून त्याच्यावरच हल्ला केला, अशी माहिती साहूने पोलिसांना दिली आहे. तो दिशाभूल करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही नवीन वर्षातील खुनाची तिसरी घटना आहे.