Nagpur: सहा लाख गुंतवा, १५ लाख कमवा; नातेवाईकानेच लावला चुना, ४२ लाख रुपये लुबाडले!

By योगेश पांडे | Updated: May 14, 2025 22:52 IST2025-05-14T22:50:26+5:302025-05-14T22:52:19+5:30

Nagpur fake stock market scheme News: नागपुरात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली नातेवाईकांकडून ४२ लाख रुपये लुबाडण्यात आले.

Man loses over 42 lakhs in fake stock market scheme in Nagpur | Nagpur: सहा लाख गुंतवा, १५ लाख कमवा; नातेवाईकानेच लावला चुना, ४२ लाख रुपये लुबाडले!

Nagpur: सहा लाख गुंतवा, १५ लाख कमवा; नातेवाईकानेच लावला चुना, ४२ लाख रुपये लुबाडले!

योगेश पांडे, नागपूर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा कमावून देण्याचे आमिष दाखवून नातेवाईकाला ४२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.

पंकज देवीदास वाघमारे (३४, महात्मा फुले नगर, भिवापूर) असे तक्रारदाराचे नाव असून ते पुण्यात राहतात. वैभव उर्फ शुभम राजकुमार पिल्लेवान (२८, साईबाबा नगर, खरबी) व प्रसाद दत्तात्रय सुर्यवंशी (२५, साईबाबा नगर, खरबी, हंगामी मुक्काम जयताळा) हे आरोपी आहेत. 

पंकज हे पुण्यातील वारजे येथे एक इलेक्ट्रीकल फर्म चालवितात, तर त्यांची पत्नी नोकरी करते. त्यांच्या पत्नीचा भाऊ शुभम याच्या माध्यमातून २०२१ मध्ये त्यांची प्रसादसोबत ओळख झाली. प्रसादने त्याची फर्म सेबीमध्ये नोंदणीकृत असून ब्रोकरशीपचा परवाना मिळाल्याचा दावा त्याने केला. त्याने तो मोतीलाल ओसवाल कंपनीसाठीदेखील काम करत असून त्याच्याकडे ६ लाखांचा लॉट असल्याचा दावा केला. जर सहा लाख गुंतविले तर दीड वर्षांत १५ ते १८ लाख रुपये परत देईन आणि दर महिन्याला ७,२०० रुपये देईन, अशी त्याने बतावणी केली. त्यावेळी पंकज यांनी नकार दिला होता. 

आरोपी प्रसादचे आईवडील पंकज यांना भेटले व वैभवने मी त्याची गॅरंटी घेतो असे सांगितले. त्यानंतर पंकज यांनी पत्नीच्या नावे लॉट घेतला व आरोपीला सहा लाख रुपये दिले. प्रसादने पंकज यांच्या पत्नीच्या खात्यावर १.४९ लाख रुपये जमा केले. मात्र ऑगस्ट २०२२ मध्ये त्याने पैसे देणे बंद केले. शेअर बाजारात चढउतार सुरू असल्याचे त्याने कारण दिले. त्यानंतर आयकर विभागाने खाते फ्रीज केल्याचे कारण देत त्याने आणखी तीन लाख घेतले. मात्र आरोपीने त्यानंतर साडेसात लाख रुपये परतच केले नाही. पंकज यांनी चौकशी केली असता आरोपींनी प्रणय लक्षणे (१९.७४ लाख), देवदत्त चौरे (५.४५ लाख), विक्की तुपकर (२.१० लाख), चैतन्य भोयर (२.२५ लाख), सूरज चौरे (५ लाख) यांचीदेखील फसवणूक केल्याची बाब समोर आली. पंकज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव व प्रसादविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Man loses over 42 lakhs in fake stock market scheme in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.