लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीच्या परीक्षेत गैरप्रकाराला मदत करण्याच्या किंवा गंभीर गैरप्रकारात सहभागी असल्याच्या आरोपात नागपूर विभागातील १९ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय परीक्षा काळात २२ आणि परीक्षेनंतर १० अशा ३२ विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभाग अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. यंदा दहावी, बारावीला गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व पोलिस प्रशासनाचीही मदत घेण्यात आली होती. असे असतानाही विविध जिल्ह्यांत कॉपीचे गैरप्रकार झाले. मात्र, अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने माहितीच्या आधारे कारवाई केली. याअंतर्गत कॉपी प्रकारात मदत करणाऱ्या किंवा प्रश्नपत्रिकांची मोबाइलवर देवाण घेवाण करण्यात सहभागी आढळलेल्या १९ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२, गडचिरोली जिल्ह्यातील २ आणि भंडारा जिल्ह्यातील ५ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीविरोधात झालेल्या कारवाईमध्ये २२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १४ विद्यार्थी, चंद्रपूर जिल्ह्यातील ४, गडचिरोली ३ व नागपूर जिल्ह्यात १ विद्यार्थी सापडला. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांशी छेडछाड करण्याच्या प्रकारणातही १० विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची माहिती आहे. अशा एकूण ३२ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली.