Maharashtra Winter Session 2022 : अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार विधानभवनात, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 06:27 IST2022-12-20T06:27:13+5:302022-12-20T06:27:35+5:30
अडीच महिन्यांच्या बाळासह विधीमंडळात आलेल्या आ. सरोज अहिरे-वाघ आणि त्यांचे पती प्रवीण यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काैतुक केले.

Maharashtra Winter Session 2022 : अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार विधानभवनात, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
नागपूर : मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह विधानभवन परिसरात पोहोचल्या. मी आई आहे, सोबतच आमदारही आणि ही दोन्ही कर्तव्यं महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले. बाळाला बघायला पती प्रवीण वाघ व कुटुंबीय आले आहेत. मी सभागृहात असेपर्यंत ते बाळाला सांभाळतील. ३० सप्टेंबर रोजी त्याचा जन्म झाला असून, प्रशंसक असे बाळाचे नाव असल्याचे त्या म्हणाल्या.
‘प्रशंसकमुळे झाली प्रशंसा’
अवघ्या अडीच महिन्याच्या वयात विधिमंडळात पाऊल पडलेल्या प्रशंसकचे देशभर, जगभर कौतुक झाले, असे म्हणताच आमदार सरोज अहिरे-वाघ ‘लोकमत’शी बाेलताना म्हणाल्या, ‘त्याला माझ्यामुळे नव्हे तर त्याच्यामुळे मला ग्लॅमर लाभले!’