जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
By यदू जोशी | Updated: December 13, 2025 09:02 IST2025-12-13T08:59:19+5:302025-12-13T09:02:45+5:30
कोणाला किती जागा? महापौर कोणाचा असेल?अन्य पदांच्या वाटपाचाही तिढा

जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात जी चर्चा झाली त्यात वादाचे अनेक मुद्दे समोर आले आणि त्यावर तोडगा निघू शकला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. परस्परात अनेक ठिकाणी संघर्ष असून, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणे कठीण झाले आहे.
विनम्रता, निष्कलंक समर्पण आणि मूर्तिमंत सौजन्य
युतीमध्ये आमदारकीला सिटिंग-गेटिंग म्हणजे वॉर्डात आधीच्या निवडणुकीत ज्याचा आमदार जिंकला ती जागा त्याला असा फॉर्म्युला आहे. मात्र, महापालिकांच्या प्रभागांत हा फॉर्म्युला अंमलात आणण्यात अनेक अडचणी आहेत. यापूर्वी सातआठ वर्षांपूर्वी महापालिका निवडणूक झाली तेव्हा शिवसेना एकत्र होती. आजही त्यातील जे नगरसेवक उद्धवसेनेतच आहेत त्या जागा शिंदेसेनेला देण्यास भाजपचा विरोध असल्याचे म्हटले जाते. गेल्या सातआठ वर्षांत अनेक पक्षांतरे झाली व त्या आधारे ‘सिटिंग-गेटिंग’चा फॉर्म्युला अंतिम करण्यात दोघांचा एकमेकांना विरोध आहे.
पदांच्या वाटपाचाही तिढा सुटेना
निवडणुकीनंतर पदांचे वाटप (जसे महापौर, स्थायी समिती आणि इतर समित्यांचे अध्यक्ष) करायचे की निवडणुकीच्या आधीच ते निश्चित करायचे हा कळीचा मुद्दा बनला आहे. युतीबाबत काही अशांत टापू आहेत आणि तिथे दोन पक्षांत सामंजस्य निर्माण करणे सर्वात आव्हानात्मक आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदेच्या नेतृत्वातच गेल्यावेळी शिवसेनेची सत्ता आली होती, यावेळी तेथील शिंदेसेनेला वाटेकरी नको आहे.
१३१ नगरसेवकांच्या या महापालिकेत भाजपला किमान ५५ ते ६० जागा हव्या असल्याची माहिती असून, शिंदेसेनेची त्यासाठी तयारी नाही. गेल्यावेळच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत प्रचंड संघर्ष झाला होता. ‘आम्ही शिवसेनेचे मंत्री खिश्यात राजीनामे घेऊनच फिरतो, असे शिंदे म्हणाले होते’, तर ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजतो दात’ हे देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य गाजले होते. आता तर स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तिथे भाजप विरुद्ध शिंदेसेना हा टोकाचा वाद आहे. मीरा-भाईंदर, उल्हासनगरमध्येही तीच स्थिती आहे.
१३ पालिकांमध्ये पेचप्रसंग
किमान १३ महापालिका अशा आहेत की, जिथे भाजप-शिंदेसेनेची युती झाली, तर दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल. भाजपच्या वाट्याला गेलेल्या जागेवर शिंदेसेनेचे बंडखोर आव्हान देतील.
शिंदेसेनेला सुटलेल्या जागांवर भाजपमधून बंडखोरी होईल. तिसरा भिडू अजित पवार गटही युतीतच लढला, तर जागावाटपात प्रत्येकाचे समाधान करणे मुश्किल होणार आहे.