Maharashtra CM : तुम करो तो पुण्य...हम करे तो पाप : गिरीराज सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:36 IST2019-11-23T22:31:48+5:302019-11-23T22:36:00+5:30
काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला.

Maharashtra CM : तुम करो तो पुण्य...हम करे तो पाप : गिरीराज सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसंदर्भात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उचललेले हे पाऊल आहे. यामुळे राज्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल. हे स्वार्थाचे नव्हे तर जनतेच्या हिताचे राजकारण आहे. काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला.
‘अॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी गिरीराज सिंह नागपुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्राच्या हितासाठी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी नि:स्वार्थीवृत्तीच्या स्थायी सरकारची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे सरकार राष्ट्रहितात काम करेल व राज्याच्या जनतेला याचा फायदा पोहोचेल. भाजपाकडे १०५ चे संख्याबळ आहे. लोकशाहीत ज्याची संख्या जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल, असे बाळासाहेब ठाकरेदेखील एकदा म्हणाले होते. बाळासाहेबांप्रति आम्हाला आदरच आहे. जे काही राजकारण मागील काही दिवसांत झाले ते देशाने पाहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकमेकांना पाण्यात पाहात होते, ते केवळ सत्तेचा अजेंडा घेऊन आता सोबत आले आहे. राज्याला अशा नव्हे तर विकासाचा अजेंडा असलेल्या सरकारची आवश्यकता आहे, असेदेखील सिंह म्हणाले.