Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:38 PM2019-10-14T23:38:22+5:302019-10-14T23:42:05+5:30

आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

Maharashtra Assembly Election 2019: Congress-NCP leaders compromise with national interest: Yogi Adityanath | Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

Next
ठळक मुद्देविरोधकांसाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.


सक्करदरा तिरंगा चौकात आयोजित या सभेला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, शिवसेना नेते शेखर सावरबांधे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेस व राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांच्या मनात आले असते तर गरिबांसाठी कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास, दहशतवादावर वचक इत्यादी बाबी ते करू शकले असते. मात्र त्यांच्याकडे ते ‘व्हिजन’च नव्हते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या जाळ्यात अडकले आहेत. काँग्रेसकडे तर नेता नाही व नीतीही नाही. त्यांचे धोरण देशाप्रती चांगले नाही. राजकारण हे परमार्थ व लोकांच्या मदतीसाठी झाले पाहिजे. परंतु ज्यांच्यासाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन आहे, त्यांच्याकडून देशहिताची कल्पनाच करू शकत नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. अगोदरचे सरकार काही विशिष्ट लोकांसमोर गुडघे टेकायची. आता मात्र सरकार फतवे नाही तर संविधानावर चालताना दिसून येत आहे. या सरकारमध्ये समर्पणाचा भाव आहे, असेदेखील ते म्हणाले.

मोदींनी बाबासाहेबांचे स्वप्न साकार केले
देशात कलम ३७० लागू झाले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केला होता. १९५२ मध्ये त्यांनी काश्मीर या कलमामुळे विकासापासून वंचित राहील व फुटीरवादी शक्ती वाढतील, असा इशारा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने एका झटक्यात हे कलम रद्द केले व बाबासाहेबांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. नागपूर ही संघभूमी व दीक्षाभूमी आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाची ही भूमी असून आता विकासाच्या दिशेने शहराची वेगाने वाटचाल सुरू आहे, असेदेखील ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Congress-NCP leaders compromise with national interest: Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.