Maharashtra Assembly Election 2019: Chief Minister's way through Vidarbha | Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भातूनच जाणार मुख्यमंत्रिपदाचा मार्ग

Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भातूनच जाणार मुख्यमंत्रिपदाचा मार्ग

ठळक मुद्देफडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाने टाकली कात : वाढलेली सिंचन क्षमता जमेची बाजू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप-सेना महायुतीकडून ‘अब की बार, २२० के पार’ असा नारा लावण्यात येतो आहे. हा आकडा गाठण्यात विदर्भातील जागांचा सर्वात मोठा वाटा राहणार आहे. यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या गृहप्रदेशात महायुतीने जोर लावला असून, विविध राष्ट्रीय नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या विकासाच्या गाडीने वेग घेतला आहे. त्यामुळे या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर भर देण्यात येत आहे.
२०१४ नंतर केंद्रात ‘नरेंद्र’ व राज्यात ‘देवेंद्र’ असे चित्र निर्माण झाले. कधी नव्हे ते विदर्भाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद झाली व अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीलादेखील सुरुवात झाली. विशेषत: कृषी व सिंचनाशी संबंधित प्रकल्पांवर मागील पाच वर्षांत जास्त जोर देण्यात आला. त्यामुळे विदर्भात प्रचारादरम्यान या योजनांची माहिती मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचविण्यात येत आहे. २०१४ साली विदर्भाचा सिंचन अनुशेष हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. मागील पाच वर्षांत ५० हजार हेक्टरहून अधिकचा सिंचन अनुशेष दूर झाला आहे. शिवाय मागील पाच वर्षांत विदर्भाची सिंचन क्षमता १३ लाख हेक्टरहून अधिकपर्यंत नेण्यात यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे कृषिपंपांचा अनुशेषदेखील ५० टक्क्यांवर आणल्या गेला आहे. दुसरीकडे विदर्भात पायाभूत सुविधांचा विकासदेखील मोठ्या प्रमाणात झाला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे जाळे विस्तारले आहे. या बाबी घेऊनच भाजपचे कार्यकर्ते ग्रामीण भागात मतदारांपर्यंत जात आहेत.

राजकीय अनुशेषदेखील दूर
२०१४ च्या अगोदर विदर्भाच्या वाट्याला राजकीय पातळीवर फारशी महत्त्वाची पदे आली नाहीत. परंतु मागील पाच वर्षांत विदर्भातून मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री व राज्यमंत्री झाले. याअगोदर असा राजकीय संयोग कधीच पाहायला मिळाला नव्हता. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील भाजपने वरचष्मा निर्माण केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत बदललेली राजकीय परिस्थिती भाजप-सेनेसाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

शहरी भागांसाठी पायाभूत सुविधांचे मुद्दे
भाजप-सेना महायुतीतर्फे विदर्भातील शहरी भागात प्रचारादरम्यान पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात तर ‘मेट्रो’ पाच वर्षांत धावायला लागली आहेच. शिवाय येथे राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील मोठ्या प्रमाणात आल्या. मिहानमध्ये पतंजली, रिलायन्स व दसॉचा संयुक्त प्रकल्प सुरू झाला. अमरावतीत वस्त्रोद्योग पार्कमध्ये तीन उद्योग सुरू झाले. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘आयटी’ कंपन्यादेखील आल्या आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामालादेखील सुुरुवात झाली आहे. या महामार्गामुळे विदर्भ ‘लॉजिस्टिक’च्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून समोर येणार आहे, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात झालेल्या या बाबी घेऊन भाजप-सेना महायुतीचे कार्यकर्ते शहरी भागातील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Chief Minister's way through Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.