प्रत्येक काम निष्ठेने केल्यास यश
By Admin | Updated: November 10, 2014 00:59 IST2014-11-10T00:59:18+5:302014-11-10T00:59:18+5:30
ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे,

प्रत्येक काम निष्ठेने केल्यास यश
मधुकर धस : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवास
नागपूर : ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यवतमाळ तालुक्यातील घाटंजी येथील दिलासा संस्थेचे मधुकर धस यांनी केले.
प्रयास सेवांकुर, मुंडले एज्युकेशन ट्रस्ट आणि स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मुंडले सभागृहात रविवारी ‘आम्ही बिघडलो...तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात मधुकर धस यांची मुलाखत अविनाश सावजी यांनी घेतली. मधुकर धस म्हणाले, वडिलांनी शेळ्यामेंढ्या पाळून ५ एकर जमीन घेतली. आई मोलमजुरी करायची. मी सुद्धा सुट्यात काम करायचो. चौथीपर्यंतचे शिक्षण मामाकडे घेतले. शेजारच्या जोशी सरांनी आग्रह केल्यामुळे मला शाळेत घातले. वर्गात ढ विद्यार्थी होतो. दहावीला कसाबसा ४२ टक्क्यांवर पास झालो. मित्राचा शर्ट घालून परीक्षेला जावे लागले. झाडाचा डिंक काढून विकायचो. कमी टक्क्यांमुळे पुण्यात आर्टला प्रवेश घेतला. आईसोबत कराडला ऊस तोडण्यासाठी गेलो.
ऊस लावण्याचा माझा वेग पाहून मालक इतरांपेक्षा अधिक पैसे द्यायचा. त्यानंतर पोल्ट्री फार्मवर काम करून ९० टक्के अंडे असे प्रमाण वाढविल्याने मालकाने ४०० रुपये महिना दिला. गावातून एका समाजसेविकेने पत्र पाठवून गावात ३०० रुपये महिना कबूल केल्याने गावाकडे परतलो. अनेक मोर्चे काढले. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलींसाठी काम केले. पोलीस केस लागल्या. धारणीत कुपोषणग्रस्तांसाठी मोर्चा काढला. त्यानंतर घाटंजीला परतलो. पैशांसाठी मेधाताई पाटकर यांना पत्र लिहले. त्यांनी १२०० रुपये मानधन सुरू केले. बचतगटाची कामे केली.
नागपूरला ३ लाखाचा प्रकल्प मंजूर झाला. आयुष्यभर पाण्यासाठी काम करून २४० योजनांद्वारे ९ हजार एकर शेतीला आणि २६ हजार शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले. सिरपूर पॅटर्न, स्वत:चे डोह मॉडेल राबविल्याने नाबार्डने २०१२ चा नॅशनल अवॉर्ड दिला. सध्या आपल्या संस्थेत १५७ कर्मचारी असून १२ कोटींची उलाढाल होते.
घाटंजीत गावाचे उत्पन्न ७ लाख प्रतिवर्षावरून १ कोटी १२ लाखावर गेल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. अविनाश सावजी यांनी हसतखेळत त्यांची मुलाखत घेतली. प्रकट मुलाखतीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)